‘ओमायक्रॉन’बाधिताच्या संपर्कात आलेले ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2021 11:20 AM2021-12-13T11:20:21+5:302021-12-13T11:41:42+5:30
ओमायक्रॉनची बाधा असलेला रुग्ण विदेशातून आल्यावर घरी गेल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या ३० लोकांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीत ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्यानंतर दिवसभर विविध चर्चांना ऊत आला होता. संसर्गाचे प्रमाण जास्त असल्याने प्रमाण जास्त असल्याची भीती असल्याने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. सर्वच्या सर्व तीसही लोकांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तूर्तास तरी प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संभाव्य स्थितीसाठी नागपुरातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. मेयो व मेडिकलमध्ये आवश्यक तयारीवर भर देण्यात येत आहे.
ओमायक्रॉनची बाधा असलेला रुग्ण विदेशातून आल्यावर घरी गेल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या ३० लोकांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पुन्हा या लोकांसह आजूबाजूच्या घरातील लोकांचीही तपासणी केली जाईल, अशी माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी दिली.
असा आहे रुग्णाचा प्रवास
: ३ डिसेंबर रोजी पश्चिम आफ्रिकेतील बुर्किना फासो शहरातून विमानमार्गे दिल्लीकडे रवाना.
: ५ डिसेंबर रोजी दिल्ली येथून विमानाने नागपुरात आगमन.
: ५ डिसेंबर रोजी नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी.
: ६ डिसेंबर रोजी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह, ‘एम्स’मध्ये दाखल.
: ७ डिसेंबर रोजी जिनोम सिक्वेंसिंगसाठी नमुना पाठविला.
: १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून ओमायक्रॉन विषाणूची बाधा असल्याचा अहवाल प्राप्त.
कोरोना प्रतिबंधक लसच घेतली नाही
रुग्णाने कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसल्याचे आढळून आले. १० दिवसांनंतर पुन्हा त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल. यात निगेटिव्ह आल्यास होम क्वारंटाइन केले जाईल. सद्यस्थितीत संबंधित रुग्णाला कुठलीही लक्षणे नाहीत.
‘एम्स’च्या स्वतंत्र कक्षात ठेवले
उपराजधानीत आढळलेल्या पहिल्या रुग्णावर एम्सच्या एका स्वतंत्र कक्षात ठेवले, तरी ‘ओमायक्रॉन’साठी तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तशी सोय करण्यात आली आहे का, हा प्रश्न आहे. रात्री हा रुग्ण कक्षातून बाहेर आल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
१० दिवसांनंतर पुन्हा तपासणी
ओमायक्रॉनचा विषाणूची बाधा झालेल्या रुग्णाची १० दिवसांनंतर पुन्हा आरटीपीसीआर तपासणी केली जाईल. निगेटिव्ह अहवाल आल्यास रुग्णालयातून सुट्टी देण्यात येईल. सध्या रुग्णाला कोणतेही लक्षणे नाहीत. ‘ओमायक्रॉन’ची बाधा असलेल्या रुग्णांसाठी आणखी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येईल.
-डॉ.विभा दत्ता, मेजर जनरल संचालक एम्स, नागपूर
आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
ओमायक्रॉनचा रुग्ण आढळल्याने मेयो व मेडिकलमधील सुविधांचा आढावा घेण्यात आला. मेयोमध्ये सध्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही. कोरोनासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये नॉन कोविडचे रुग्ण भरती केले जात आहे; परंतु रुग्ण वाढताच येथील ६०० खाटा उपलब्ध होणार आहेत. मेडिकलमध्ये सध्याच्या स्थितीत कोरोनाचे ४ रुग्ण असलेतरी ५०० खाटा राखीव आहेत. एम्समध्ये १३ रुग्ण असून २०० खाटांची सोय आहे. एकूण कोरोनासाठी १३०० खाटा आहेत. याशिवाय जवळपास १५५ खासगी रुग्णालय आहेत. मेयो, मेडिकलला नॉन कोविडचे रुग्णांची भरती कमी करण्याचा सूचना देण्यात आल्याची माहिती आहे.
...तर ४८ तासांत कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू
ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण जरी आढळून आला तरी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. कोणतेही कोविड रुग्णालय बंद करण्यात आलेले नाही. रुग्ण कमी असल्याने नॉन कोविडचे रुग्णांना तिथे भरती केले जात आहे. कोरोनाचे रुग्ण वाढताच ४८ तासांत कोविड रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा सूचना याआधीच देण्यात आल्या आहेत.
-डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी, मनपा
ऑक्सिनजसाठी आवश्यक नियोजन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जवळपास ९५ टक्के रुग्णांना ऑक्सिजन लागले. यामुळे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यास दर दिवसाला ४०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागण्याची शक्यता आहे. तसे नियोजनही करण्यात आले आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरात १२५ मेट्रिक टनचा जम्बो टँक, सावनेर व उमरेड येथे क्रायोजनिक जनरेशन प्लांट उभारण्यात आले आहे. हवेतून ऑक्सिजन (पीएसए) काढण्यासाठी एम्स, मेयोमध्ये प्रत्येकी ३ तर मेडिकलमध्ये ४ असे १० प्लांट कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहेत. यातील ५ प्लांटची क्षमता १६०० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजनची, तर उर्वरित ५ प्लांट हे ३२०० लिटर प्रतिमिनिट ऑक्सिजन क्षमतेचे आहेत.