नागपुरातील अपघातसदृश हत्याकांडामध्ये ठार झालेल्यांना आधीच लागली होती चाहूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 10:40 AM2017-12-21T10:40:56+5:302017-12-21T10:44:14+5:30

मंगळवार १९ पहाटे उपराजधानीत घडलेल्या हत्याकांडामागील सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. हे हत्याकांड करायचेच असे आरोपींनी आधीच ठरवून व नियोजन करून ठेवले होते.

The people who died in the accidental murder case in Nagpur were already caught | नागपुरातील अपघातसदृश हत्याकांडामध्ये ठार झालेल्यांना आधीच लागली होती चाहूल

नागपुरातील अपघातसदृश हत्याकांडामध्ये ठार झालेल्यांना आधीच लागली होती चाहूल

Next
ठळक मुद्देजेवण करताना बाजारगावमध्येच होणार होता गेमबारमधून सटकल्याने काही वेळ बचावले

नरेश डोंगरे।
आॅनलाईन लोकमत
नागपूर : मंगळवार १९ पहाटे उपराजधानीत घडलेल्या हत्याकांडामागील सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. हे हत्याकांड करायचेच असे आरोपींनी आधीच ठरवून व नियोजन करून ठेवले होते. या हत्याकांडात ठार झालेल्यांत भुऱ्या उर्फ संजय कनोई बनोदे (वय ४०) आणि बादल संजय शंभरकर (वय २६) यांचा समावेश होता तर राजेश यादव (वय ४५) हा त्यांचा साथीदार गंभीर जखमी झाला होता.
मित्राच्या वाढदिवसाचे निमित्त साधून भूऱ्या आणि बादलला खूप दारू पाजायची आणि नंतर त्या दोघांचाही गेम करायचा, असा कट गणेश मेश्राम आणि त्याच्या साथीदारांनी रचला होता. मात्र, मेश्राम आणि साथीदारांचे मनसुबे लक्षात आल्यामुळे भूऱ्या आणि बादल तेथून सटकले. त्यामुळे पुढच्या आठ ते दहा तासांचे त्यांना जीवदान मिळाले. मात्र, कोणत्याही स्थितीत भूऱ्या आणि बादलला संपवायचेच, अशा ईर्षेने पेटलेल्या आरोपींनी या दोघांचा रात्रभर पाठलाग केला अन् अखेर त्यांना संपवलेच.
दोन खून, अनेक खुनाचे प्रयत्न, हाणामाऱ्या, खंडणी वसुली, अपहरण आणि अशाच ३२ गंभीर गुन्ह्यांचा आरोपी असलेला भूऱ्या ऊर्फ संजय बनोदे (वय ४०) याची शहरातील गुन्हेगारी जगतात प्रचंड दहशत होती. त्याला तडीपार करूनही तो शहरातच राहत होता. त्याच्यासोबतच बादल शंभरकर हा दिवसाढवळ्या तलवार लावून कुणालाही लुटत होता, खंडणी वसूल करीत होता. पोलिसांनाही तो जुमानत नव्हता. त्याचीही एमआयडीसी परिसरात प्रचंड दहशत होती. तुलनेत या दोघांची हत्या करणारा गणेश मेश्राम कुख्यात नव्हता. गणेश मेश्राम करू (जुगारात पत्ते बदलविण्याची कला जाणणारा) आहे. तो जयताळ्यात जुगार अड्डा चालवतो. आरोपी बादल आणि भूऱ्या त्याच्याकडून नेहमी खंडणी वसूल करायचा.
महिनाभरापूर्वी बादलने विक्की पटले याला १ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. एक लाख रुपये आता किंवा २० हजार रुपये महिना दे, नाहीतर जीवे ठार मारेन,अशी धमकीही दिली होती. राजकीय वरदहस्त असलेल्या विक्की पटलेने बादलविरुद्ध त्यावेळी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रारही नोंदवली होती. तो एकीकडे पोलिसांना सापडत नव्हता. दुसरीकडे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याचा वावर होता. पैशासाठी भूऱ्या आणि बादल वारंवार त्रास देत असल्यामुळे गणेश मेश्राम त्रस्त झाला होता. १५ दिवसांपूर्वी बादलने मेश्रामच्या जुगार क्लबमध्ये तलवारीच्या धाकावर हैदोस घालून क्लब लुटला होता. त्याला मारहाणही केली होती. ही माहिती मेश्रामने आपल्या खतरनाक गुन्हेगार साथीदारांना सांगून बादल आणि भूऱ्याचा बंदोबस्त करण्याची विनंती केली होती. त्याला त्याच्या गुन्हेगार साथीदाराने भूऱ्या आणि बादलचा गेम करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, मेश्राम काहिसा भेकड स्वभावाचा असल्याने तो स्वत: गुन्हा करण्यासाठी धजावत नव्हता. मात्र, काही दिवसांपूर्वी बादलने पुन्हा गणेश मेश्रामच्या सूरज नामक साथीदाराला मारहाण करून अपमानित केले. त्यामुळे मेश्राम आणि त्याच्या साथीदारांनी या दोघांच्या हत्येचा कट रचला.

भूऱ्याला मर्डरची चाहूल लागली
मेश्रामच्या जुगार अड्ड्यावर येणाऱ्या एकाचा सोमवारी वाढदिवस होता. तेथेच या दोघांचा गेम करण्याची आरोपींनी तयारी केली. त्यानुसार भूऱ्या, बादलसह त्यांचे डझनभर गुन्हेगार साथीदार दुपारी बाजारगावला गेले. एका बारमध्ये मेश्राम आणि अन्य आरोपीही होते. दारू पिताना तेथे क्षुल्लक कारणावरून मेश्राम आणि त्याच्या एका साथीदाराला बादल आणि भूऱ्याने शिवीगाळ केली. तो अपमान सहन झाला नाही म्हणून मेश्रामने त्याच्या एका साथीदाराला फोन केला. मुझे भूऱ्याने मारा... उसको नही छोडेंगे असे म्हटले. त्यानंतर भूऱ्या आणि बादलचा गेम करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. त्या लक्षात आल्या म्हणून मित्रांची मोटरसायकल घेऊन भूऱ्या आणि बादल तेथून सटकले. ते लपतछपत उमरेड मार्गाकडे आले. मात्र, सूडाने पेटलेला मेश्राम आपल्या साथीदारासह त्याच्या मागावरच होता.

कारमध्येच खाणेपिणे
भूऱ्या-बादलला आज सोडायचे नाहीच, असे ठरवून निघालेला मेश्राम आपल्या साथीदारांना घेऊन कारमधून त्यांचा पाठलाग करीत होता. त्यासाठी त्याने कारमध्येच बीअर, दारूच्या बाटल्या आणि चिकन-तंदुरीसह खाण्यापिण्याचे साहित्य तसेच लोखंडी रॉड आणि शस्त्रे घेतली होती. तिकडे अघटित होणार याची चाहूल लागल्याने भूऱ्या आणि बादल रात्रभर लपूनछपून फिरत राहिले. त्यामुळे त्यांना काही तासांचे जीवदान मिळाले. पहाटेला कडाक्याच्या थंडीत कुणी मागे येणार नाही, असा समज करून घेत ते राजेश यादवसह खरबीकडे लपण्यासाठी निघाले. मात्र, मेश्रामने त्यांचा अखेर गेम केलाच. हत्या केली मात्र रचलेल्या कटानुसार तो अपघात वाटावा म्हणून त्यांनी शस्त्रांचा वापर करण्याचे टाळले. परंतु हत्याकांडानंतर स्वत:च स्वत:च्या हाताने आपल्या कारला दुसऱ्या एका वाहनाची धडक दिल्यामुळे मेश्राम आणि साथीदारांचा डाव फसला. आता या हत्याकांडात किती आरोपी आहेत, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: The people who died in the accidental murder case in Nagpur were already caught

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :crimeगुन्हे