पक्ष फोडणाऱ्यांच्या विरोधाचा निकाल असेल, कोण असली-नकली हे जनता ठरवेल : जयंत पाटील
By कमलेश वानखेडे | Published: April 12, 2024 03:22 PM2024-04-12T15:22:34+5:302024-04-12T15:30:07+5:30
ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधाचा निकाल असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला
नागपूर : महाराष्ट्र मध्ये दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणून नकली आणि असली हा प्रकार तयार करणे आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधाचा निकाल असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. वर्धा येथे अमर काळे यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी सकाळी जयंत पाटील यांचे नागपुरात आगमन झाले.
यावेळी पत्रकारांशी बोलता ते म्हणाले, एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्यांना नकली म्हणायचे. ज्यांनी फोडाफोड केली त्यांनीच कोण असल्याने कोण नकली हे सांगायचे. त्यापेक्षा जनतेला ठरवू द्या कोण असली आणि कोण नकली आहे ते. शरद पवारांना एनडीएमध्ये नेण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. ते तयार असते तर गेलेच असते. पण शरद पवार जाण्यासाठी कधीच तयार नव्हते. त्यांनी ही विचारसरणी स्वीकारायला नकार दिल्याने पक्ष फुटला, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला समाधान आहे राज ठाकरेची तुलना नरेंद्र मोदीच्या बरोबरीने होत आहे. त्यांच्याबरोबर बसण्याचा स्वीकार भाजपने केला यासाठी स्वागत केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. सुनेत्रा पवार यांच्यासाठी राज ठाकरेंचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता दिसत आहे. हे राज ठाकरेसाठी चांगले आहे. पण राज ठाकरेंना एकही जागा मिळाली नाही, कदाचित विधानसभेचे आश्वासन असेल, असा चिमटाही त्यांनी काढला.
सुप्रिया सुळे नक्की जिंकतील
मागील दहा वर्षांपासून सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून येत आहे. भाषण करायचं असेल म्हणून भाषण अजितदादा बोलत असतील. सुळे यांनी काम केले असेल म्हणूनच त्या निवडून आल्या आहेत. त्या पुन्हा निवडून येतील मला याची खात्री आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.