शरद पवारांना विदर्भवाद्यांचे खडे बोल : जनताच धडा शिकवेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:54 AM2018-02-24T09:54:39+5:302018-02-24T09:54:54+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भाच्या विषयावर केलेल्या वक्तव्यावर विदर्भवाद्यांकडून टीकेचा भडीमार केला जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विदर्भाच्या विषयावर केलेल्या वक्तव्यावर विदर्भवाद्यांकडून टीकेचा भडीमार केला जात आहे. विशेषत: ‘विदर्भाची मागणी ही मूठभर हिंदी भाषिकांची आहे’ या वक्तव्यावर विदर्भवादी नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विदर्भाचा प्रदेश हा बहुभाषिक आहे व विविध भाषा बोलणारे लोक तीन-चार पिढ्यांपासून विदर्भात वास्तव्य करीत असून त्याचा आम्हाला अभिमान आहे. पश्चिम महाराष्ट्रच्या नेत्यांनी कायम विदर्भावर अन्याय केला आहे. त्यामुळे विदर्भाचा अनुशेष ७५ हजार कोटींवर गेला आहे. पवारांच्या काळातही विदर्भाला न्याय मिळाला नाही. या मुद्याला बगल देण्यासाठी शरद पवार भाषेचा वाद निर्माण करीत असल्याची टीका त्यांनी केली. पवारांनी विदर्भाच्या मुद्यावर बोलू नये. विदर्भातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर असून केवळ एक आमदार निवडून आला आहे. पवारांनी विदर्भाचा विरोध केल्यास पुढल्या वेळी एकही राहणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
विदर्भ बहुभाषिक असण्याचा अभिमानच
कोणत्याही प्रदेशाच्या सीमेवर राहणाऱ्या जिल्ह्यात दोन भाषा प्रचलित असतात. गोंदियात हिंदी, चंद्रपूरला तेलगू त्याचप्रमाणे सोलापूर-कोल्हापुरात कानडी बोली प्रचलित आहे व यात आश्चर्य नाही. विशेष म्हणजे विदर्भाच्या सर्व ११ जिल्ह्यात विविध भाषेचे लोक पिढ्यान् पिढ्यापासून राहत आहेत. ही आमची संस्कृती असून याचा आम्हाला अभिमान आहे. विदर्भाचा लढा या सर्वांनी मिळून लढला आहे. विदर्भासाठी संघर्ष करणारे बापूजी अणे, जांबुवंतराव धोटे हे अमराठी होते काय? अमराठी असलेले प्रफुल्ल पटेल यांना तुम्ही पक्षात का घेतले? आम्ही भाषावाद मानत नाही, त्यामुळे तुम्ही मराठी-अमराठी असे भांडण लावू नका. विदर्भाच्या जनतेला स्वयंनिर्णयाचा हक्क आहे. एकदा एक बोलायचे आणि दुसरीकडे वेगळे, ही पश्चिम महाराष्ट्रच्या नेत्यांना सवय आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला अर्थ नाही. विदर्भाचे आंदोलन हे येथे राहणाऱ्या सर्व भाषिकांचे आहे. त्यामुळे पुण्यात बसून चर्चा करण्यापेक्षा हिंमत असेल तर येथे येऊन चर्चा करा.
- श्रीनिवास खांदेवाले, विदर्भवादी नेते, अर्थतज्ज्ञ
हा शरद पवारांचा दोगलेपणा
शरद पवार हे पुण्या-मुंबईत वेगळी भाषा आणि विदर्भात आल्यावर वेगळी भाषा बोलतात. हा त्यांचा दोगलेपणा आहे. आम्हाला सर्व भाषांचा अभिमान आहे व विदर्भात राहणाºया प्रत्येक भाषेच्या माणसांना वेगळा विदर्भ हवा आहे. त्यामुळे मराठी-अमराठी असा वाद उकरून काढणे, हा पश्चिम महाराष्ट्रच्या नेत्यांचा सुनियोजित कट आहे. मात्र हा कट येथे शिजणार नाही. बापूजी अणे, श्रीहरी अणे, जांबुवंतराव धोटे हे काही अमराठी नव्हेत. मात्र असा भाषेचा वाद निर्माण करून विदर्भाच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपशी जवळीक करता यावी म्हणून विदर्भाला डावलण्याचा हा पवारांचा प्रयत्न आहे. मात्र हा प्रयत्न जनता यशस्वी ठरू देणार नाही. येत्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला हद्दपार करू आणि सुनियोजितपणे विदर्भाला फसविणाऱ्या भाजपालाही हद्दपार करू.
- मुकेश समर्थ, व्ही-कनेक्ट, विदर्भवादी
विदर्भाच्या जखमेवर मीठ चोळले
विदर्भभरात पसरलेली वेगळा विदर्भनिर्मितीची चळवळ ही जनतेतून उमटलेली चळवळ असून या चळवळीला खीळ घालण्याचे प्रयत्न वेळोवेळी होत असतात. महात्मा गांधी व विनोबाजी यांच्या वास्तव्याने विदर्भातील जनतेत परस्पर आदरभाव असून हिंदी व मराठी भाषिक हा फरक येथे कदापि केला जात नाही. दोन्ही भाषेबद्दल येथील जनतेला सारखाच आदर आहे. राष्ट्रभाषा हिंदी व मातृभाषा मराठी या दोन्ही भाषा घराघरात बोलल्या जातात. शरद पवारांसारख्या वरिष्ठ नेत्याकडून अशाप्रकारचा भाषावाद व वर्गवाद अपेक्षित नाही. पिंपरी चिंचवडच्या साहित्य संमेलनाच्या वेळीही त्यांनी अशा प्रकारचेच वक्त व्य केले होते. याशिवाय त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात विदर्भ राज्य निर्मितीस स्थान नाही, असे वक्तव्य करणे म्हणजे वैदर्भीय जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. पवारांसारख्या नेत्यांकडून वारंवार होत असलेल्या अशाप्रकारचे वक्तव्य विदर्भाच्या चळवळीला व विकासालाही मारक आहेत. विदर्भ माझा पक्ष या मनोवृत्तीचा जाहीर निषेध करतो.
- राजकुमार तिरपुडे, संस्थापक अध्यक्ष, विदर्भ माझा पक्ष
‘फोडा आणि राज्य करा’चा कट
शरद पवार हे मराठी-अमराठी वाद निर्माण करून ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणातून राजकीय फायदा घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. महाराष्ट्रने नागपूर कराराचे पालन केले नाही. त्यामुळे हजारो कोटींचा अनुशेष वाढला असून मागासलेपणा सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, विदर्भातील युवकांची बेरोजगारी अशा समस्यांवर पवार बोलत नाही. राज्याची ७५ टक्के वीज विदर्भात तयार होते व त्याचा फायदा उर्वरीत महाराष्ट्रघेतो. हे सोडून भाषेचा वाद निर्माण करून विषयापासून भटकवित आहेत. याशिवाय त्यांनी पूर्व व पश्चिम विदर्भ असाही भेद करण्याचा प्रयत्न केला आहे. पवारांना विदर्भाचा नकाशा समजावण्याची गरज आहे, असे वाटते.
- वामनराव चटप, अर्थतज्ज्ञ व विदर्भवादी नेते
मूळ मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न
अशा प्रकारचे वक्तव्य करणे ही पवारांची जुनी खोड आहे. या नेत्यांनी आतापर्यंत विदर्भावर अन्यायच केला असून हा प्रदेश मागासलेला राहिला आहे. या मूळ मुद्यापासून भटकविण्यासाठी असे वक्तव्य करून भाषावाद निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. विदर्भात सर्व भाषेचे लोक अनेक वर्षापासून राहतात. त्यामुळे हा भाषेचा मुद्दा नाही. हा मुद्दा विदर्भाच्या अस्मितेचा, विकासाचा आणि लाखो युवकांच्या रोजगाराचा आहे.
- प्रबीरकुमार चक्रवर्ती
विदर्भवादी नेते मराठी-अमराठी पवारांनी ठरवू नये
विदर्भ राज्याच्या विषयामध्ये मराठी-अमराठी वाद विनाकारण निर्माण केला आहे. विदर्भाचा मुद्दा येथे राहणाऱ्या सर्व भाषिकांचा आहे. त्यामुळे विदर्भाची मागणी मराठीची की अमराठीची हे ठरविण्याचा अधिकार शरद पवारांना नाही. महाराष्ट्रने विदर्भाचे सिंचनाचे ७५ हजार कोटी, रस्त्यांचे १८ हजार कोटी व इतर कामांचे ५० हजार कोटी रुपये पळवून नेले आहेत. त्यामुळे विदर्भाचा मुद्दा हा भाषेचा नाही तर आर्थिक आहे. महाराष्ट्रत राहून विदर्भाचे भले होणार नाही, येथील युवकांना नोकऱ्या मिळणार नाही. अशाप्रकारे भाषेचा वाद निर्माण करणे पवारांसारख्या नेत्यांना शोभत नाही. राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते-कार्यकर्तेही विदर्भाच्या बाजूने आहेत. त्यामुळे पवारांनी दुतोंडी वक्तव्य करू नये. याशिवाय पूर्व व पश्चिम विदर्भातील ९२ टक्के जनतेने विदर्भाच्या बाजूने मतदान केले आहे व यात सर्व भाषिक आहेत, ही गोष्ट पवारांनी लक्षात घ्यावी.
- राम नेवले, संयोजक, विदर्भ राज्य आंदोलन समिती