विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी लोक सहभाग महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:27 AM2019-01-12T01:27:39+5:302019-01-12T01:30:45+5:30
विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच लोक सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी जनजागृतीसोबतच लोक सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी येथे केले.
ऊर्जा व कामगार मंत्रालयाच्या वतीने विद्युत सप्ताहाचा शुभारंभ करताना त्या बोलत होत्या. सिव्हिल लाईन्स येथील चिटणीस सेन्टर येथे आयोजित या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक रमेश गोयनका, अधीक्षक अभियंता विनय नागदेव, दिनेश कोडे उपस्थित होते.
महापौर जिचकार पुढे म्हणाल्या, लोकसहभागामुळे विजेपासून होणारे अपघात रोखणे शक्य आहे. जनतेने देखील विजेची उपकरणे हाताळताना पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक आहे. यामुळे प्राणांतिक अपघातास आळा घालणे शक्य होईल. विजेपासून होणारे अपघात रोखण्यासाठी सातत्याने जनजागृती करणे आवश्यक आहे.
आज वीज आपल्या आयुष्याचा घटक झाली असली तरी तिचा सुरक्षितपणे वापर करणे आवश्यक असून असे न केल्यास अपघात होऊ शकतो याकडे मुख्य विद्युत निरीक्षक संदीप पाटील यांनी लक्ष्य वेधले. यावेळी ऊर्जा विभागाच्या वतीने प्रकाशित ‘विद्युत तरंग’ या स्मरणिकेसोबत कॅलेंडर आणि डायरीचे विमोचन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रामदास खंडागळे,श्यामसुंदर राजपूत,शरद दुरूगकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.