आजच्या शिक्षण पद्धतीचा टक्केवारीकडे कल; लीला पुनावाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 10:42 AM2017-12-08T10:42:34+5:302017-12-08T10:42:50+5:30

आजचे शिक्षण केवळ टक्केवारीवर केंद्रित असून जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. जीवन जगता येईल, असे कौशल्यावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समाजसेविका पद्मश्री लीला पुनावाला यांनी येथे केले.

Percentage is today's education system; Leela Punawala | आजच्या शिक्षण पद्धतीचा टक्केवारीकडे कल; लीला पुनावाला

आजच्या शिक्षण पद्धतीचा टक्केवारीकडे कल; लीला पुनावाला

Next
ठळक मुद्देकौशल्य आधारित शिक्षणावर भर देणे आवश्यक

आॅनलाईन लोकमत
नागपूर : आजचे शिक्षण केवळ टक्केवारीवर केंद्रित असून जास्तीत जास्त गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. जीवन जगता येईल, असे कौशल्यावर आधारित शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन समाजसेविका पद्मश्री लीला पुनावाला यांनी येथे केले.
पुनावाला यांनी लोकमत भवनाला बुधवारी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी लोकमत मीडिया समूहाच्या वरिष्ठ संपादकीय सदस्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत त्यांचे पती फिरोज पुनावाला आणि अ‍ॅड. गुरू रोडा मेहता उपस्थित होते. लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले.
लीला पुनावाला फाऊंडेशनतर्फे अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देण्यासाठी सर्व पाहुणे नागपुरात आले होते. यावर्षी फाऊंडेशनतर्फे विदर्भातील ४७८ विद्यार्थिनींना ४० हजार ते एक लाखापर्यंत शिष्यवृत्ती दिली आहे. आम्ही विद्यार्थिनींना केवळ शिष्यवृत्तीच देत नाही तर प्रशिक्षण देऊन त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहन देतो, असे पुनावाला यांनी सांगितले.
७३ वर्षीय लीला पुनावाला या ‘अल्फा लावल’च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. विद्यार्थिनींना मदत करण्याच्या मोहिमेबद्दल त्यांनी सांगितले की, हा प्रवास २३ वर्षांपूर्वी मुख्यत्वे पुणे जिल्ह्यातील केवळ २० विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती देऊन सुरू झाला. उत्तर-पूर्व जिल्ह्यातील विद्यार्थिंनी मोठ्या संख्येने आकर्षित झाल्यामुळे नंतर आम्ही सातारा जिल्ह्यातील पाचगणीला जोडले. त्यानंतर मोहिमेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात केला. चार वर्षांपूर्वी विदर्भ क्षेत्रात कार्य सुरू केले.
चर्चेत सहभागी होत फिरोज पुनावाला यांनी फाऊंडेशनच्या २३ वर्षांच्या कार्याची माहिती दिली. ते म्हणाले, लीला फाऊंडेशनने आतापर्यंत सात हजारांपेक्षा जास्त विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती दिली आहे. आम्ही प्रशासकीय खर्चाची मर्यादा केवळ १० टक्क्यांपर्यंत ठेवून जास्त पैसा लाभार्थींना देतो. यावर्षी एकूण ११.५० कोटी रुपयांपैकी ९ कोटी रुपये शिष्यवृत्तीवर खर्च होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
लीला पुनावाला म्हणाल्या, फाऊंडेशनतर्फे वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येतात. त्यानंतर आलेल्या अर्जांना निवड समितीकडे पाठवून लाभार्थींच्या यादीवर शिक्कामोर्तब करण्यात येते.
लीला पुनावाला यांच्या ४९ सहकाऱ्यांनी पीएच.डी पदवी घेतली आहे. अनेक जण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा पास करून राज्य शासनात वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
पुनावाला १९४७ मध्ये आपल्या कुटुंबीयांसह पाकिस्तानातून पुणे येथे आल्या. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी संपादन केली. ही पदवी संपादन करणाºया त्या पहिल्या महिला होत्या. त्यांनी ‘अल्फा लावल’मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्षा बनल्या. त्यांच्या कार्यकाळात ‘अल्फा लावल’ची उलाढाल ५०० दशलक्षवरून २.५० बिलियन रुपयांवर पोहोचली. सामाजिक आणि विशेष कार्यासाठी त्यांना १९८९ मध्ये पद्मश्री मिळाली.
या प्रसंगी अशोक जैन यांच्या हस्ते लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा लिखित ‘पब्लिक इश्यू बिफोर पार्लमेंट’ हे पुस्तक आणि लोकमत व लोकमत समाचारचे विशेष दिवाळी अंक त्यांना भेटस्वरुपात देण्यात आले.

Read in English

Web Title: Percentage is today's education system; Leela Punawala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.