बाधितांचा टक्का घसरला मात्र धोका अद्यापही कायम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:08 AM2021-05-18T04:08:59+5:302021-05-18T04:08:59+5:30
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, संक्रमणाची टक्केवारी अद्यापही १५ ...
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/कामठी/ हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, संक्रमणाची टक्केवारी अद्यापही १५ टक्क्यांपर्यंत आहे. रविवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तेरा तालुक्यांत ३,४४३ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. ग्रामीण भागात ९ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १ लाख ३६ हजार ५२९ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी १,६७४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने ही संख्या १ लाख २० हजार ६४८ इतकी झाली आहे.
ग्रामीण भागात रुग्णसंख्येत घट होत असताना गावागावातील गुजरीत नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. यासोबतच अनेक तालुक्यांत कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने संक्रमणाचा धोका अद्यापही टळला नसल्याने नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सावनेर तालुक्यात १३ रुग्णांची नोंद झाली. यात सावनेर शहरातील ६ तर ग्रामीण भागातील ७ रुग्णांचा समावेश आहे.
नरखेड तालुक्यात ४६ रुग्णांची नोंद झाली. यात नरखेड शहरातील ४ तर ग्रामीणमधील ४२ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १,३३५ तर १३४ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ५, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (१९), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (३) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात १५ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ५२५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ४५ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील १९ तर ग्रामीण भागातील २६ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील कचारी सावंगा केंद्रांतर्गत १८, कोंढाळी व येनवा केंद्रांतर्गत प्रत्येकी ४ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात २२५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही व वेलतूर येथे प्रत्येकी (२), मांढळ (३), साळवा (५) व तितूर येथे १० नवीन रुग्णांची भर पडली.
रामटेक तालुक्यात ९ रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील १ व ग्रामीणमधील ८ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत ६,४१८ रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ६,००८ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. उमरेड तालुक्यात ३६ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ३ तर ग्रामीण भागातील ३३ रुग्णांचा समावेश आहे. कामठी तालुक्यात ११ रुग्णांची नोंद झाली. हिंगणा तालुक्यात ४२७ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यात हिंगणा येथे ७, वानाडोंगरी (५), इसासनी (३), नीलडोह (२), खैरीपन्नासे, मांडवघोराड, इसासनी, टाकळघाट व रायपूर येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.
कळमेश्वरला दिलासा
गत आठवड्यात दररोज २०० रुग्णसंख्या असलेल्या कळमेश्वर तालुक्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तालुक्यात केवळ २१ रुग्णांची नोंद झाली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी शहरातील ४ तर ग्रामीण भागातील १७ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात भंडागी, घोराड येथे प्रत्येकी ३, खैरी हरजी, धापेवाडा येथे प्रत्येकी दोन, साहुली, दहेगाव, सावंगी, धुरखेडा, वरोडा, खैरी लख्मा, कन्याडोल येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.