ग्रामीण भागात बाधितांचा टक्का घसरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:07 AM2021-05-29T04:07:50+5:302021-05-29T04:07:50+5:30
सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/रामटेक/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात करण्यात आलेल्या ...
सावनेर/काटोल/कळमेश्वर/हिंगणा/उमरेड/रामटेक/कुही : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार तेरा तालुक्यात करण्यात आलेल्या ४५२२ चाचण्यांपैकी १४६ (३.२२ टक्के) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत १,४१,५७४ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील १,३५,६०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर २२७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण भागात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३२९० इतकी आहे. शुक्रवारी ७२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
सावनेर तालुक्यात आठ रुग्णांची नोंद झाली. आठही रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. सावनेर शहरात एकाही रुग्णाची नोंद नाही. कुही तालुक्यात १४० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात सावंगी येथे सहा, तर वेलतूर येथे एका रुग्णाची नोंद झाली. कळमेश्वर तालुक्यात सात रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी नगरपालिका क्षेत्रातील पाच, तर ग्रामीण भागातील दोन रुग्णांचा समावेश आहे.
हिंगणा तालुक्यात ४०३ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वानाडोंगरी व भान्सुली येथे प्रत्येकी पाच, निलडोह (३), गुमगाव, हिंगणा व देवळी येथे प्रत्येकी दोन तर शिरूळ, नागलवाडी, मेटाउमरी, मांगली, टाकळघाट व कान्होलीबारा येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ११,८७१ नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील ११,००७ कोरोनामुक्त झाले तर २७६ रुग्णांचा मृत्यू झाला.
रामटेक तालुक्यात पाच रुग्णांची नोंद झाली. पाचही रुग्ण ग्रामीण भागातील आहे. रामटेक शहरात एकाही रुग्णाची नोंद नाही. तालुक्यात आतापर्यंत ६,५१० रुग्णाची नोंद झाली आहे. यातील ६,३०६ कोरोनामुक्त झाले तर १२३ रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २०४ इतकी आहे.
काटोलला दिलासा
काटोल तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्यास प्रशासनाला यश आले आहे. तालुक्यात शुक्रवारी एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.