परफॉर्मन्स सुधारा अन्यथा मंडळ, सेल बरखास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:27 AM2017-09-07T01:27:21+5:302017-09-07T01:27:34+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवस-रात्र काम करीत आहेत. मात्र, दुसरीकडे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये काहीशी शिथिलता आली आहे. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. याची जाणीव ठेवून पक्षाच्या आघाड्या व सेलच्या पदाधिकाºयांनी कामाला गती दिली पाहिजे. जे काम करणार नाहीत, महिनाभरात परफॉर्मन्स सुधारणार नाहीत त्या आघाड्या व सेल बरखास्त करून नव्याने नियुक्ती केली जाईल, असा इशारा शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिला.
शहर अध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी भाजपाच्या विविध २२ आघाडी व सेलचे अध्यक्ष, महामंत्री यांची बैठक घेतली. यावेळी महामंत्री संदीप जाधव, किशोर पलांदूरकर, संघटनमंत्री भोजराज डुंबे आदी उपस्थित होते. या बैठकीत आघाडी व सेलने गेल्या सहा महिन्यात कोणकोणती कामे केली, याचा आढावा घेतला. काही आघाडीचे अध्यक्ष केलेल्या कामाची माहिती व्यवस्थित सांगू शकले नाहीत तर काही बनवाबनवी करीत असल्याचे निदर्शनास आले. याची गंभीर दखल घेत कोहळे यांनी संबंधितांना ताकीद दिली.
कोहळे म्हणाले, काही लोक फक्त पदे घेऊन घरी बसले आहेत. त्यांची आघाडी फक्त कागदावरच सुरू आहे. आता तसे होणार नाही. लोकसभेची निवडणूक तोंडावर आहे. प्रत्येकाला पक्षासाठी आपले योगदान द्यायचे आहे. प्रत्येकाने केलेल्या कामाचा लेखाजोखा पक्षातर्फे ठेवला जात आहे. त्यामुळे आपल्याकडे कुणाचेही लक्ष नाही, असे कुणी समजण्याचे कारण नाही. पदाधिकारी निष्क्रिय झाले आहेत, असे निदर्शनास आले तर पद काढून घेऊन आघाडी बरखास्त करायला वेळ लागणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आघाड्यांना साप्ताहिक बैठक सक्तीची
- प्रत्येक आघाडी व सेलची शहरस्तरावर साप्ताहिक बैठक घेतली जावी. या बैठकीचा अहवाल शहर कार्यालयाकडे सादर करावा. प्रत्येक आघाडी व सेलने मंडळ तसेच प्रभागस्तरापर्यंत रचना करावी. यासाठी सक्षम कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांची नियुक्ती करावी; सोबत प्रत्येक आघाडी व सेल सोशल मीडियावर सक्रिय असावा. पक्षातर्फे राबविण्यात असलेले उपक्रम व सरकारतर्फे केली जात असलेली कामे याचा प्रचार-प्रसार करण्यात आघाड्यांनी पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही देण्यात आल्या.