नागपूर विभागाची कामगिरी सुधारली : दहावीत मुलींचीच बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 09:05 PM2020-07-29T21:05:09+5:302020-07-29T21:07:03+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवारी जाहीर करण्यात आला. ‘कोरोना’मुळे भूगोल विषयाची परीक्षाच न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक होती. परंतु मागील वर्षीच्या तुलनेत नागपूर विभागाचा निकाल यंदा चक्क २६ टक्क्यांनी वाढला. संपूर्ण विभागाच्या निकालाची टक्केवारी ९३.८४ टक्के इतकीच आहे. यंदा राज्यात विभाग सहाव्या स्थानी आहे.
विभागात नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली असून उत्तीर्णांमध्येदेखील विद्यार्थिनींचेच प्रमाण जास्त आहे. विभागातून ७८ हजार ६८९ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली व त्यातील ७५ हजार ३६८ उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९५.७८ टक्के इतकी आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रमाण ९१.९९ टक्के इतके आहे. नागपूर विभागात एकूण १ लाख ६१ हजार ३८८ पैकी १ लाख ५१ हजार ४४४ परीक्षार्थ्यांनी यश संपादित केले.
विभागात गोंदिया जिल्हा ‘टॉप’
नागपूर विभागात यंदा गोंदिया जिल्ह्यातील उत्तीर्णांचे प्रमाण सर्वात जास्त आहे. गोंदिया जिल्ह्यातून २० हजार ५२९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली व त्यापैकी १९ हजार ५४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी ९५.२२ टक्के इतकी आहे. तर विभागात उत्तीर्णांची सर्वात कमी टक्केवारी वर्धा जिल्ह्याची आहे. तेथे १६ हजार ७४२ पैकी केवळ १५ हजार ४१९ म्हणजे ९२.१० टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षीच्या तुलनेत तेथील निकाल तब्बल २७ टक्क्यांनी वाढला आहे.
जिल्हानिहाय उत्तीर्णांची टक्केवारी
जिल्हा निकाल (२०२०) निकाल (२०१९)
भंडारा ९४.४१ % ६५.९९ %
चंद्रपूर ९२.४४ % ६५.५८ %
नागपूर ९४.६६ % ७१.७४ %
वर्धा ९२.१० % ६५.०५ %
गडचिरोली ९२.६९ % ५४.६५ %
गोंदिया ९५.२२ % ६८.४६ %