लोहयुगीन काळात पश्चिम विदर्भात होती मानवी वस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 10:10 AM2019-06-26T10:10:32+5:302019-06-26T10:11:52+5:30
लोहयुगीन काळातील वस्त्या या पूर्व विदर्भातच होत्या, असे आतापर्यंत मानण्यात येत होेते. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे अमरावती जिल्ह्यातील फुबगाव येथे सुरू असलेल्या खोदकामातून नवीन माहिती समोर आली आहे.
वसीम कुरेशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोहयुगीन काळातील वस्त्या या पूर्व विदर्भातच होत्या, असे आतापर्यंत मानण्यात येत होेते. मात्र भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागातर्फे अमरावती जिल्ह्यातील फुबगाव येथे सुरू असलेल्या खोदकामातून नवीन माहिती समोर आली आहे. पश्चिम विदर्भातदेखील लोहयुगीन काळात मानवी वस्ती होती ही बाब स्पष्ट झाली आहे. खोदकामादरम्यान लोहयुगीन ले आऊट, घरं, भांडी, दागिने, चुली, शेती इत्यादींशी संबंधित अवशेष प्राप्त झाले आहेत.
जानेवारी महिन्यापासून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे पथक खोदकामाला लागले होते. तीन महिन्यांपर्यंत हे काम चालले. त्यानंतर येथे मिळालेल्या अवशेषांचा अभ्यास व संबंधित दस्तावेज तयार करण्यात आले. तेथे तीन ते चार हजार वर्षांअगोदर लोहयुगीन मानव मोठ्या घरांमध्ये राहत होते, हे खोदकामातून स्पष्ट झाले आहे. दहा बाय दहा मीटरच्या एकेका ले आऊटमध्ये गच्चीसाठी वापरण्यात आलेल्या बांबूंचे खोल खड्डेदेखील मिळाले आहेत. यासोबतच धान्य ठेवण्यासाठी असलेले मातीचे भांडे जसेच्या तसे मिळाले. जेवण तयार करण्यासाठीची चूल, शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडाच्या नांगराचा मोठा भागदेखील मिळाला. शिवाय पथकाला गवत कापण्याचे अवजार, जेवण बनविण्याचे सामान व भांड्यांचे प्राचीन अवशेषदेखील प्राप्त झाले आहेत. गाय, बैल इत्यादी जनावरांची हाडेदेखील मिळाली. त्या काळात मनुष्य जनावरांचे मांस भाजून किंवा तयार करून खात होते असादेखील खुलासा करण्यात आला आहे. त्या काळातील महिलांच्या दागिन्यांमध्ये लावण्यात येणारे विशेष दगडांचे आकर्षक डिझाईनवाले मणीदेखील सापडले आहेत.त्या काळात लोक आपल्या मुलांच्या मनोरंजनाला महत्त्व देत होते हेदेखील स्पष्ट झाले आहे. मुलांच्या खेळण्यांचे अवशेषदेखील सापडले आहेत.
आणखी खोदकाम करणार
विदर्भातील खापा व सावनेरच्या रिठीरांझना येथे लोहयुगीन वस्तीची माहिती मिळाली होती. मात्र पश्चिम विदर्भात असे काहीच आढळून आले नव्हते. खापा व रिठीरांझनाप्रमाणे फुबगाव येथे ‘कबरी’ मात्र आढळून आल्या नाहीत. फुबगाव पूर्णा नदीला लागून आहे. त्यामुळे पुरादरम्यान ‘कबरी’ वाहून गेल्या असण्याची शक्यता आहे. पुढील चरणात फुबगावमध्ये आणखी खोदकाम करण्यात येणार आहे. लोहयुगीन मानवाने राहण्यासाठी ही जागा का निवडली होती व त्यांचे राहणीमान नेमके कसे होते हे जाणून घेण्याचा यातून प्रयत्न होणार आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सहायक पुरातत्त्वशास्त्रज्ञ पी.पी.सोनोने यांनी दिली.
नागपूरहून फुबगाव २१० किलोमीटर अंतरावर आहे
खोदकामासाठी २५ लाख रुपये खर्च करण्यात आले.
खोदकामादरम्यान विभागाचे २० सदस्य सहभागी झाले होते.
दुसºया टप्प्यातील खोदकाम डिसेंबर २०१९ पासून सुरू होईल.