नागपूर शहरातील कोचिंग क्लासेसला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 09:50 PM2021-01-18T21:50:38+5:302021-01-18T21:53:40+5:30
Permission for coaching classes मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागपूर महापालिका हद्दीतील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग, संगणक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस १८ जानेवारीपासून सुरू करण्याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सशर्थ परवानगी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिशन बिगीन अगेन अंतर्गत नागपूर महापालिका हद्दीतील सर्व कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था, टायपिंग, संगणक प्रशिक्षण संस्था, कोचिंग क्लासेस १८ जानेवारीपासून सुरू करण्याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सशर्थ परवानगी दिली आहे. सोमवारी याबाबत आदेश निर्गमित केले.
मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार इयत्ता नववीपासून पुढील कोचिंग क्लासेस सॅनिटायझेशन व सोशल डिस्टन्सिंगबाबतचे मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करण्याच्या अटीस अधीन राहून परवानगी देण्यात आली आहे. कोचिंग क्लोसेससह मनपा क्षेत्रातील विविध शासकीय प्रशिक्षण संस्थांनाही परवानगी देण्यात आली आहे. याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाने स्वतंत्रपणे मानक कार्यप्रणाली निर्गमित केल्यानुसार त्याचे अनुपालन करणे आवश्यक राहील.
क्रीडा स्पर्धा, उपक्रमांना परवानगी
राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षण घेतात, अशा संस्थांना क्रीडा स्पर्धांचे आयोजन, बैठक व विविध क्रीडा उपक्रमांच्या आयोजनाबाबतही मनपा आयुक्तांद्वारे परवानगी प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये यात मनपा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रशिक्षण संस्थांचा समावेश असून, या संदर्भात क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे स्वतंत्रपणे मानक कार्यप्रणाली निर्गमित केल्यानुसार त्याचे अनुपालन करणे बंधनकारक राहील, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
सूचनांचे पालन करणे बंधनकारक
प्रशिक्षण संस्था, तसेच कोचिंग क्लासेस सुरू करताना सदर संस्थांनी कोव्हिड १९च्या प्रसारास प्रतिबंध करण्याच्या अनुषंगाने शासनाद्वारे निर्गमित करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक राहिल. प्रशिक्षणार्थीची थर्मल गनद्वारे तपासणी, मास्कचा वापर, सॅनिटायझचा वापर, सोशल डिस्टन्स, संस्थांमधील प्रशिक्षक व व्यवस्थापन कर्मचारी यांची कोविड १९साठी आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.