नागपुरात व्यवसायासाठी आयुक्तांची परवानगी आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2020 09:51 PM2020-08-01T21:51:16+5:302020-08-01T21:52:44+5:30
नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात दुकान व्यवसाय व मालाचा साठा करण्यासाठी आता मनपा आयुक्तांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ च्या कलम ३७६ मधील तरतुदीनुसार नवी व्यवस्था लागू करण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्तांची परवानगी न घेता व्यवसाय, दुकाने लावता येणार नाहीत. अन्यथा नियमानुसार कारवाई होऊ शकते. नागपूर शहरात एमएमसी कायद्यातील तरतुदीची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्याची माहिती उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी दिली. झोन कार्यालयात याबाबतचे अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यानुसार दुकानदार व व्यावसायिकांना अर्ज करावे लागतील. यासाठी वेगवेगळे शुल्क निर्धारित करण्यात आले आहे. मनपा कार्यक्षेत्रात यापूर्वी अशी व्यवस्था लागू नव्हती. यासंदर्भात आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत. परवानगीशिवाय व्यवसाय व दुकान सुरू करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जावी, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. यात दिवाणी व फौजदारी खटला दाखल होऊ शकतो.
जाणकारांच्या माहितीनुसार, नव्या आदेशानुसार महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात वाढू शकते. परवानगी देण्याच्या संदर्भात झोन कार्यालयातर्फे कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय कोणत्याही प्रकारची शुल्क आकारणी करता येत नाही. समितीने अद्याप अशा स्वरूपाच्या कुठल्याही प्रस्तावाला मंजुरी दिली नसल्याने अशी शुल्क आकारणी योग्य नसल्याचा आरोप केला जात आहे.