आधी दिली परवानगी, आता फटाके फोडू नका असे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 11:58 AM2020-11-12T11:58:18+5:302020-11-12T11:58:40+5:30
Diwali Nagpur News आधी परवानगी दिली व आता फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. यामुळे फटाके उडवायचे की नाही, तसेच फटाके विकायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर शहरात फटाके विक्रीला बंदी केलेली नाही. मात्र महापालिका आयुक्तांनी सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्याला निर्बंध घातले आहेत. तसेच मोठ्या आवाजाचे फोडण्याला बंदी घातली आहे. दुसरीकडे फटाके विक्रेत्यांना परवानगी देण्यात आली. आधी परवानगी दिली व आता फटाके फोडू नका, असे आवाहन केले आहे. यामुळे फटाके उडवायचे की नाही, तसेच फटाके विकायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, सार्वजनिक ठिकाणी तसेच सायलेंट झोनमध्ये फटाके फोडायला निर्बंध घातले आहेत. तसेच मोठ्या आवाजाचे फटाके फोडायला बंदी घातली आहे. दिवाळीतही कोविड-१९ नियमांचे पालन बंधनकारक आहे.
-राधाकृष्णन बी., आयुक्त मनपा
मनपा व पोलीस प्रशासनाने फटाके विक्रीला परवानगी दिली. आम्ही लाखो रुपयांचा माल खरेदी केला. आता मोठ्या आवाजाच्या फटाक्यांवर बंदी घातली. फटाके फोडू नका असे आवाहन केले जात आहे. याचा विक्रीवर परिणाम होत असल्याने माल विकला गेला नाही तर आमचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
राहुल आकोत, फटाके विक्रेता
कोरोनाचे सकट अद्याप कायम आहे. अशा परिस्थितीत दिवाळी दीपोत्सव म्हणून साजरी करावी. फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुले व वृद्ध यांना श्वास घेण्याला त्रास होतो. अधिक आवाजाच्या फटाक्यांना घातलेली बंदी योग्यच आहे.
- धनराज गोतमारे, पालक