विना परवानगी धावत आहेत प्रचाररथ
By Admin | Published: February 13, 2017 10:17 PM2017-02-13T22:17:05+5:302017-02-13T22:17:05+5:30
खासगी व व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक आहे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 13 - खासगी व व्यावसायिक वाहनांचा प्रचाररथ म्हणून वापर करण्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाची (आरटीओ) परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत केवळ १४ वाहनांनी परवानगी घेतली आहे. यामुळे विना परवानगी मोठमोठे होर्डिंग व निवडणूक चिन्हांची प्रतिकृती लावून शेकडो वाहने रस्त्यावर धावत आहे. यात शासनाचा महसूल बुडत आहे, शिवाय अशा वाहनांकडून अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. शहरात ११३५ उमेदवार रिंगणात आहे. प्रचाराचा वेगही वाढला आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी वाहनांना हात, कमळ, धनुष्यबाण, घड्याळ, रेल्वे इंजिन, कप-बशी, हत्ती, सिलिंडर, नगारा, असे आकार देऊन किंवा निवडणूक चिन्हांचे, उमेदवाराचे फलक लावलेली वाहने वस्त्यावस्त्यांमधून व चौका-चौकांतून फिरत आहे. विशेष म्हणजे, प्रचाराचे प्रभावी तंत्र मानले जाणारे प्रचाररथ तयार करताना वाहनांच्या अंतर्गत रचनेत कोणताही बदल करण्याची परवानगी नसते. वाहनांच्या बाह्य स्वरूपात मात्र बदल करता येतो. अनेक उमेदवार आपल्या राजकीय पक्षाच्या निवडणूक चिन्हाचे आकार वाहनांना देतात, तर काही जण वाहनांवर केवळ फलक, पोस्टर लावून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, प्रचाररथ किंवा जाहिरात लावलेली वाहने तयार करण्यासाठी उमेदवाराला निवडणूक आयोगानंतर मोटारवाहन कायद्यानुसार आरटीओची परवानगी घेणे बंधनकारक आहे. वाहनाची सर्व कागदपत्रे वैध आहेत का, वाहनाची बाह्य रचनेतील बदल, चालकाच्या दृष्टिक्षेपात बाधा तर नाही ना अशा घटकांचीी तपासणी करून आरटीओकडून परवानगी दिली जाते. मात्र आतापर्यंत नागपूर शहर प्रादेशिक परिवहन कार्यालयातून १३ तर पूर्व नागपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातून केवळ एका वाहनांनी आरटीओत हजेरी लावून परवानगी घेतली आहे. यातून आरटीओला सुमारे १४ हजार रुपये महसूल मिळाला आहे. मात्र उमेदवारांची संख्या लक्षात घेतल्यास परवानगी घेतलेल्या वाहनांची संख्या फारच कमी असल्याचे खुद्द आरटीओ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
असे आहेत नियम
प्रत्येक वाहनाच्या प्रकारानुसार जाहिरातीचा आकार ठरविण्यात आला आहे. वाहनांच्या दर्शनी भागावर जाहिराती लावण्यास बंदी आहे. जाहिरात वाहनाच्या लांबी, रुंदीपेक्षा जास्त नसावी. जाहिरातीमुळे वाहनाचे हेडलाईट, टेललाईट, इंडिकेटर, रिअर व्हु मीरर, नंबर प्लेट आदी आच्छादित होणार नाही, पक्षाचा झेंडा वाहनचालकाच्या दृष्टीसमोर नसावा. चकाकणाऱ्या, प्रकाशमान जाहिरातींवर निर्बंध असून ३.८ मीटर उंचीपर्यंतच जाहिरात लावण्याला मंजुरी आहे.