संजीवनी काेविड सेंटरची परवानगी रद्द हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:59+5:302021-05-10T04:08:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कामठी : रनाळा येथील पंकज मंगल कार्यालय परिसरात प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या संजीवनी काेविड सेंटरची परवानगी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कामठी : रनाळा येथील पंकज मंगल कार्यालय परिसरात प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आलेल्या संजीवनी काेविड सेंटरची परवानगी आता रद्द हाेण्याच्या मार्गावर आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संजीवनी काेविड सेंटरला नाेटीस बजावली असून, याबाबत रनाळा ग्रामपंचायतीकडून परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ग्रामपंचायतीची मंजुरी मिळाली तरच हे काेविड सेंटर सुरू करण्यात येईल, असेही बजावले आहे.
रनाळा येथील पंकज मंगल कार्यालय परिसरात संजीवनी काेविड सेंटर सुरू हाेत असल्याचे कळताच सरपंचासह नागरिकांनी त्यास तीव्र विराेध दर्शविला हाेता. सरपंच सुवर्णा साबळे यांनी तहसीलदार अरविंद हिंगे यांना निवेदन साेपविले. त्यात पंकज मंगल कार्यालय चौकात संजीवनी कोविड सेंटर सुरू होत असून, या परिसरात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे तेथे भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात दुकानेसुद्धा आहेत. त्यामुळे वर्दळीच्या या जागेवर कोविड सेंटर सोयीचे होणार नाही, असे निवेदनाद्वारे सांगण्यात आले हाेते. प्रशासनाने या काेविड सेंटरकरिता २५ बेडची जिल्हा प्रशासनाच्या ४ मे रोजीच्या आदेशान्वये मंजुरी दिली हाेती. परंतु रनाळा ग्रामपंचायतीने काेविड सेंटरला विराेध दर्शवीत या काेविड सेंटरची मंजुरी रद्द करण्याचे पत्र जिल्हा व स्थानिक प्रशासनाला सादर केले हाेते. दरम्यान, त्या पत्राची दखल घेत जिल्हा प्रशासनाने संजीवनी काेविड सेंटरला रविवारी नाेटीस बजावली आहे. यात कोविड केअर सेंटर सुरू करण्याकरिता ग्रामपंचायत रनाळा यांची परवानगी घ्यावी, अन्यथा कोविड केअर सेंटर म्हणून देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.