पेंचसह उमरेड-पवनीतील पर्यटनाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 10:57 AM2020-07-01T10:57:44+5:302020-07-01T10:58:34+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्प व उमरेड पवनी कऱ्हाडला अभयारण्यात १८ मार्चपासून बंद झालेले वनपर्यटन १ जुलैपासून सुरू होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प व उमरेड पवनी कऱ्हाडला अभयारण्यात १८ मार्चपासून बंद झालेले वनपर्यटन १ जुलैपासून सुरू होत आहे. स्थानिक लोकांचा रोजगार लक्षात घेता, अनलॉक-२ च्या प्रक्रियेमध्ये या पर्यटनाला मान्यता देण्यात आली आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या सूचनानुसार मंगळवारी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्जजीव) यांनी एक पत्र काढून या दोन्ही ठिकाणच्या पर्यटनाला परवानगी दिली. हे पर्यटन मर्यादित स्वरूपात असून ऑफलाईन पद्धतीने असेल. सुरेवानी, नागलवाडी, पवनी, कऱ्हाडला पर्यटन गेटवरून सकाळी व दुपारी प्रत्येकी तीन वाहने सोडण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सुरेवानी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, अमलतास पर्यटन केंद्र सिल्लारी आणि कऱ्हाडला पर्यटन गेट या ठिकाणी बुकिंगची व्यवस्था असून सोमवारी, बुधवारी पर्यटन बंद राहणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक रविकिरण गोवेकर यांनी ही माहिती दिली आहे.
सुरक्षा नियमांसाठी कडक धोरण
या पर्यटनामध्ये केवळ जीप किंवा तत्सम वाहनांना परवानगी देण्यात आली असून कऱ्हाडंलामध्ये जिप्सी वापरणे बंधनकारक असेल. प्रवेश देण्यापूर्वी पर्यटकांची आरोग्य तपासणी केली जाईल. १० वर्षांआतील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवेश नसेल.