विद्यार्थ्यांच्या गणवेशाला मिळाली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 11:48 PM2020-06-27T23:48:45+5:302020-06-27T23:52:23+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वितरित करण्यात येते. यंदा कोविड-१९ मुळे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यात ७५ हजारावर विद्यार्थ्यांसाठी ४.५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत गणवेश वितरित करण्यात येते. यंदा कोविड-१९ मुळे शाळा कधी सुरू होईल, यासंदर्भात अजूनही संभ्रम आहे. परंतु सरकारने विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधीची तरतूद केली आहे. नागपूर जिल्ह्यात ७५ हजारावर विद्यार्थ्यांसाठी ४.५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक परिषदेचे पत्र प्राप्त झाले आहे.
केंद्र सरकारने समग्र शिक्षा अभियानांतर्गत २०२०-२१ वर्षासाठी मोफत गणवेश योजनेला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. समग्र शिक्षा अभियानातून जिल्हा परिषद व महापालिकेच्या शाळेत शिक्षणाऱ्या वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वितरित करण्यात येतो. यात सर्व विद्यार्थिनी व अनुसूचित जाती-जमाती व बीपीएलमध्ये मोडणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश असतो. प्रति विद्यार्थी २ गणवेशासाठी ६०० रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गणवेशाचा निधी हा शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेनेच खर्च करायचा आहे. गणवेशाचा रंग व प्रकार ठरविण्याचा निर्णय समिती घेऊ शकणार आहे. तरतुदीपेक्षा अधिक खर्च मान्य केला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश दिले आहे.
जि.प.च्या ओबीसी व खुल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार गणवेश
समग्र शिक्षा अभियानातून मोफत गणवेशाचा लाभ खुल्या व ओबीसी विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे जि.प.ने स्वत: अर्थसंकल्पात ४५ लाख रुपयांची तरतूद या विद्यार्थ्यांसाठी केली आहे. त्यामुळे यंदा सर्वच विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.