नागपुरात भूतबाधेची भीती दाखवून छळ; एका मांत्रिकाला अटक, दुसरा फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 03:44 PM2021-02-11T15:44:01+5:302021-02-11T15:46:09+5:30

Nagpur News तीन लाख रुपये दे, नाही तर तुझ्या कुटुंबीयांना जादूटोणा करून संपवून टाकू, असा धाक दाखवत या भामट्यांनी तिचा तब्बल दोन आठवडे प्रचंड मानसिक छळ केला.

Persecution for fear of demon possession in Nagpur; One magician arrested, another absconding |  नागपुरात भूतबाधेची भीती दाखवून छळ; एका मांत्रिकाला अटक, दुसरा फरार

 नागपुरात भूतबाधेची भीती दाखवून छळ; एका मांत्रिकाला अटक, दुसरा फरार

Next
ठळक मुद्देवृद्धेच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीएक लाख रुपये हडपले 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - मुलाला भूतबाधा झाल्याची भीती दाखवून दोन मांत्रिकांनी एका वृद्धेकडून एक लाख रुपये हडपले. त्यानंतर तीन लाख रुपये दे, नाही तर तुझ्या कुटुंबीयांना जादूटोणा करून संपवून टाकू, असा धाक दाखवत या भामट्यांनी तिचा तब्बल दोन आठवडे प्रचंड मानसिक छळ केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा बुधवारी भंडाफोड झाला. नंतर पोलिसांनी स्वयंघोषित गिरी महाराज उर्फ राज साहेबराव मंदी (वय २५, रा. पंचेदार फाटा, ता. काटोल) आणि त्याचा साथीदार तात्या विंचू उर्फ रंजित (वय ३५, रा. जामगड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

माला सुरेश वर्मा (वय ६२)असे पीडित वृद्धेचे नाव आहे. त्या भिवसनखोरीतील गाैतमनगरात राहतात. त्यांच्या मुलाची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चांगली नव्हती. २५ जानेवारीच्या दुपारी डोक्याला लावण्याचे तेल विकण्याच्या बहाण्याने गिरी महाराज उर्फ राज मंदी हा भामटा वस्तीत आला. विविध व्याधीवर हे तेल खुपच गुणकारी आहे, अशी थाप मारून त्याने माला वर्मा यांना तेल घेण्यास बाध्य केले. वर्मा यांचा विश्वास जिंकून आरोपी फंदीने त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरू केल्या. बोलता बोलता वर्मा यांनी मुलाच्या प्रकृतीचा विषय काढला. मुलाला बघितल्यानंतर या भामट्याने स्वताच्या अंगात आणले अन् तुमच्या मुलाला भूतबाधा झाली, अशी थाप मारली. मांत्रिकाकडून पूजा करावी लागेल, असे सांगत आरोपी मंदीने त्याचा साथीदार तात्या विंचू उर्फ रंजितला दोन दिवसानंतर वर्मा यांच्या घरी आणले.

पूजा करण्याच्या नावाखाली वर्मा यांच्या देवघरासमोर खड्डा खोदला. तेथे तंत्रमंत्र करत वर्मा कुटुंबीयांच्या मनात भीती पेरली आणि महापूजा तसेचआैषधाच्या नावाने ४ लाखांची मागणी केली. वर्मा यांच्याकडून एक लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा तीन लाख रुपये मिळावे म्हणून या दोन भामट्यांनी त्यांना अक्षरशा वेठीस धरले. पैसे मिळावे म्हणून तेवारंवार फोन करू लागले. जादूटोणा करून वर्मा कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यांचा जाच असह्य झाल्याने अखेर वर्मा कुटुंबीयांनी आपल्या आप्तस्वकियांसोबत चर्चा केली आणि बुधवारी गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी तसेच अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी गिरी महाराज उर्फ मंदीला अटक केली. त्याचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Persecution for fear of demon possession in Nagpur; One magician arrested, another absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.