भूतबाधेची भीती दाखवून छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:08 AM2021-02-12T04:08:15+5:302021-02-12T04:08:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलाला भूतबाधा झाल्याची भीती दाखवून दोन मांत्रिकांनी एका वृद्धेकडून १ लाख रुपये हडपले. त्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलाला भूतबाधा झाल्याची भीती दाखवून दोन मांत्रिकांनी एका वृद्धेकडून १ लाख रुपये हडपले. त्यानंतर ३ लाख रुपये दे, नाही तर तुझ्या कुटुंबीयांना जादूटोणा करून संपवून टाकू, असा धाक दाखवत या भामट्यांनी तिचा तब्बल दोन आठवडे प्रचंड मानसिक छळ केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा बुधवारी भंडाफोड झाला. नंतर पोलिसांनी स्वयंघोषित गिरी महाराज ऊर्फ राज साहेबराव मंदी (वय २५, रा. पंचेदार फाटा, ता. काटोल) आणि त्याचा साथीदार तात्या विंचू ऊर्फ रंजित (वय ३५, रा. जामगड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
माला सुरेश वर्मा (वय ६२) असे पीडित वृद्धेचे नाव आहे. त्या भिवसनखोरीतील गाैतमनगरात राहतात. त्यांच्या मुलाची गेल्या काही दिवसांपासून प्रकृती चांगली नव्हती. २५ जानेवारीच्या दुपारी डोक्याला लावण्याचे तेल विकण्याच्या बहाण्याने गिरी महाराज ऊर्फ राज मंदी हा भामटा वस्तीत आला. विविध व्याधीवर हे तेल खूपच गुणकारी आहे, अशी थाप मारून त्याने माला वर्मा यांना तेल घेण्यास बाध्य केले. वर्मा यांचा विश्वास जिंकून आरोपी फंदीने त्यांच्याशी गप्पागोष्टी सुरू केल्या. बोलता बोलता वर्मा यांनी मुलाच्या प्रकृतीचा विषय काढला. मुलाला बघितल्यानंतर या भामट्याने स्वत:च्या अंगात आणले अन् तुमच्या मुलाला भूतबाधा झाली, अशी थाप मारली. मांत्रिकाकडून पूजा करावी लागेल, असे सांगत आरोपी मंदीने त्याचा साथीदार तात्या विंचू ऊर्फ रंजितला दोन दिवसानंतर वर्मा यांच्या घरी आणले. पूजा करण्याच्या नावाखाली वर्मा यांच्या देवघरासमोर खड्डा खोदला. तेथे तंत्रमंत्र करत वर्मा कुटुंबीयांच्या मनात भीती पेरली आणि महापूजा तसेच औषधाच्या नावाने ४ लाखांची मागणी केली. वर्मा यांच्याकडून १ लाख रुपये घेतल्यानंतर पुन्हा ३ लाख रुपये मिळावे म्हणून या दोन भामट्यांनी त्यांना अक्षरश: वेठीस धरले. पैसे मिळावे म्हणून ते वारंवार फोन करू लागले. जादूटोणा करून वर्मा कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यांचा जाच असह्य झाल्याने अखेर वर्मा कुटुंबीयांनी आपल्या आप्तस्वकियांसोबत चर्चा केली आणि बुधवारी गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी तसेच अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपी गिरी महाराज ऊर्फ मंदीला अटक केली. त्याचा साथीदार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.