मांत्रिकांकडून वृद्धेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:09 AM2021-02-12T04:09:21+5:302021-02-12T04:09:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुलाला भूतबाधा झाल्याची भीती दाखवून दोन मांत्रिकांनी एका वृद्धेकडून १ लाख रुपये हडपले. त्यानंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुलाला भूतबाधा झाल्याची भीती दाखवून दोन मांत्रिकांनी एका वृद्धेकडून १ लाख रुपये हडपले. त्यानंतर ३ लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या कुटुंबीयांना जादूटोणा करून संपवून टाकू, असा धाक दाखवत या भामट्यांनी तिचा तब्बल दोन आठवडे प्रचंड मानसिक छळ केला. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या खळबळजनक प्रकरणाचा बुधवारी भंडाफोड झाला. नंतर पोलिसांनी स्वयंघोषित गिरी महाराज ऊर्फ राज साहेबराव मंदी (वय २५, रा. पंचेदार फाटा, ता. काटोल) आणि त्याचा साथीदार तात्या विंचू ऊर्फ रंजित (वय ३५, रा. जामगड) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
माला सुरेश शर्मा (वय ६२) असे पीडित वृद्धेचे नाव आहे. त्या भिवसनखोरीतील गाैतमनगरात राहतात. दाभा चाैकात चहा-नाश्त्याची त्या टपरी चालवितात. त्यांच्या मुलाला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची नेहमीच प्रकृती बिघडते. २५ जानेवारीच्या दुपारी माला वर्मा आपल्या टपरीवर असताना त्यांचा मुलगा दारूच्या नशेत झिंगत आला. प्रकृती चांगली नसताना दारू पिऊन आल्याने माला यांनी त्याला झापणे सुरू केले. तेवढ्यात तेथे डोक्याला लावण्याचे तेल विकणारा आरोपी गिरी महाराज ऊर्फ राज मंदी आला. त्या दारुड्या मुलाने त्रस्त असल्याचे हेरून त्याने शर्मा यांचा विश्वास जिंकला. आपण याची दारू झटक्यात सोडवू शकतो, अशी थाप मारून दुसऱ्या दिवशी तो एका मांत्रिकाला (रंजितला) शर्मांकडे घेऊन आला. रंजितने शर्मा यांच्या मुलाला बघताच स्वत:च्या अंगात आल्याचे सोंग केले. तो तात्या विंचूसारखा आरडाओरड करू लागला.
तुमच्या मुलाला भूतबाधा झाली आहे, असे सांगतानाच तुमच्या घरात मोठे गुप्तधन असल्याचीही त्याने थाप मारली. दोन्हीसाठी पूजा करावी लागेल. त्यासाठी चार लाखांचा खर्च येईल, असे म्हटले. गुप्तधनाच्या आमिषात माला शर्मा यांनी होकार देऊन स्वत:चे दागिने गहाण ठेवत तसेच इकडून तिकडून उधार घेऊन आरोपींच्या हातात १ लाख रुपये ठेवले.
देवघरासमोर खड्डा खोदला
आरोपींनी शर्मा यांच्या घरात अंगारेधुपारे सुरू केले. मुलाला गंडेदोरे केल्यानंतर वेगवेगळ्या धातुच्या मूर्ती, कपड्याच्या बाहुल्या, वेगवेगळ्या रंगांचे काचेचे तुकडे आणून पूजा करण्याच्या नावाखाली शर्मा यांच्या घरातील देवघरासमोर खड्डा खोदला. तेथे तंत्रमंत्र करत शर्मा मायलेकाच्या मनात भीती पेरली. नंतर पुन्हा महापूजा आणि औषधाच्या नावावर ३ लाख रुपयांची मागणी करून या दोन भामट्यांनी त्यांना अक्षरश: वेठीस धरले.
अखेर पोलीस ठाणे गाठले
घरात गुप्तधन निघाले नाही, दुसरीकडे आरोपीचा तगादा वाढल्याने माला शर्मा आरोपींना टाळू लागल्या. त्यामुळे आरोपी जादूटोणा करून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देऊ लागले. त्यांचा जाच असह्य झाल्याने अखेर माला शर्मा यांनी आपल्या आप्तस्वकीयांना आपबिती सांगितली. त्यांनी दिलासा दिल्यामुळे मंगळवारी गिट्टीखदान पोलीस ठाणे गाठले.
पोलिसांनी रचला सापळा
माला शर्मा यांची तक्रार ऐकून पोलिसांनी त्यांना आरोपीचा फोन आल्यास ‘पैसे जमले, या आणि घेऊन जा’, असा निरोप देण्यास सांगितले. त्यानुसार, बुधवारी शर्मा यांनी आरोपीचा फोन येताच त्यांना रक्कम घेण्यास बोलविले. त्यानुसार भामटा गिरी महाराज ऊर्फ मंदी बुधवारी सायंकाळी पोहोचला अन् दबा धरून बसलेल्या गिट्टीखदान पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी तसेच अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला आज पोलीस उपनिरीक्षक डी. सी. पटले यांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याचा चार दिवस पीसीआर मंजूर केला. पोलीस आता आरोपी रंजितचा शोध घेत आहेत.
विशेष म्हणजे, मांत्रिकांकडून ठगविण्याची महिनाभरातील ही शहरातील दुसरी केस आहे. यापूर्वी पारडीतील एका मांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली एका अल्पवयीन मुलीसह तिच्या आई, मामी आणि आजीवर बलात्कार केल्याची प्रचंड संतापजनक घटना उघड झाली होती.