‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ प्रवेशात पर्सेन्टाईल’चा खोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 10:17 AM2018-06-21T10:17:21+5:302018-06-21T10:17:28+5:30
सद्यस्थितीत सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे निकाल जाहीर झाले असून प्रवेशाचे वारे सुरू आहेत. मात्र ‘बीएएमएस’ व ‘बीएचएमएस’मध्ये प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
योगेश पांडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सद्यस्थितीत सर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे निकाल जाहीर झाले असून प्रवेशाचे वारे सुरू आहेत. मात्र ‘बीएएमएस’ व ‘बीएचएमएस’मध्ये प्रवेश घेणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’ पात्रतेसोबतच किमान ‘पर्सेन्टाईल’ची अट लागू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, राज्य सामाजिक प्रवेश परीक्षा कक्षाने यासंदर्भातील बदल हे ‘नीट’चे निकाल जाहीर केल्यानंतर जारी केले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी हे प्रवेशाला मुकण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ या आयुष पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे ‘नीट’मधील गुणांच्या आधारावरच होतात. ‘नीट’मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थी आतापर्यंत प्रवेशासाठी पात्र ठरत होता. किमान गुणांची कुठलीही अट यापूर्वी नव्हती. मात्र यंदापासून आयुष मंत्रालयाने किमान ‘पर्सेन्टाईल’ची अट अंतर्भूत केली. यासंदर्भात मंत्रालयाने १२ फेब्रुवारी २०१८ व ५ जून २०१८ रोजी पत्राद्वारे राज्य शासनाला कळविले होते. मात्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे याची दखलच घेण्यात आली नाही व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलीच नाही.
दरम्यान, ६ जून रोजी प्रवेश परीक्षा कक्षाने प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रकदेखील जारी केले व अनेक विद्यार्थ्यांनी यासाठी ‘आॅनलाईन’ नोंदणीदेखील केली. मात्र ११ जून रोजी आयुष मंत्रालयातर्फे प्रवेशासाठी किमान ‘पर्सेन्टाईल’ची अट सर्व राज्यांनी पाळण्याची ताकीदच देण्यात आली. ‘आयुष’ मंत्रालयाचे संचालक फ्रँकलिन खोबूंग यांनी तसे पत्रच पाठविले. त्यानंतर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे १५ जून रोजी पत्र जारी करून या अटीनुसार प्रवेशप्रक्रिया राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
आमचा दोष काय?
यासंदर्भात विद्यार्थ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. जर केंद्र शासनाने प्रवेशप्रक्रियेबाबत राज्य शासनाला फेब्रुवारी महिन्यातच कळविले होते तर ‘पर्सेन्टाईल’ची अट राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने विद्यार्थ्यांपर्यंत का पोहोचविली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ‘नीट’ परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर व प्रवेशासाठी अर्ज दाखल केल्यानंतर याबाबत सुधारित निकष जारी करणे हा आमच्यावर अन्याय असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
काय आहे ‘पर्सेन्टाईल’ची अट?
मागील वर्षीपर्यंत ‘बीएएमएस’, ‘बीएचएमएस’ या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी ‘नीट’मधील किमान गुणांची अट नव्हती. यंदा किमान ‘पर्सेन्टाईल’चे निकष लावण्यात आले आहेत. त्यानुसार खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ‘नीट’मध्ये किमान ५० ‘पर्सेन्टाईल’ तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४० ‘पर्सेन्टाईल’ असणे आवश्यक आहे.