पत्रिकेत नाव नसल्यामुळे खासदार तुमाने नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:17 AM2017-09-23T01:17:05+5:302017-09-23T01:17:19+5:30
कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात उभारण्यात आलेल्या विपश्यना मेडिटेशन सेंटरचे शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात उभारण्यात आलेल्या विपश्यना मेडिटेशन सेंटरचे शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आपल्या रामटेक लोकसभा मतदारसंघात सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने चांगलेच नाराज झाले. हा राजशिष्टाचाराचा भंग असून याप्रकरणी संसदेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
ओगावा सोसायटीसोबतच राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, माजी मंत्री अॅड. सुलेखा कुंभारे उपस्थित होत्या. या सर्व मान्यवरांची नावे निमंत्रण पत्रिकेतही होती. मात्र, खासदार कृपाल तुमाने यांचे नाव पत्रिकेत नव्हते. कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघात कामठीचा समावेश आहे. त्यामुळे राजशिष्टाचारानुसार खासदार म्हणून तुमाने यांचे नाव या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत असणे आवश्यक होते. मात्र, त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले नाही. यावर तुमाने यांनी नाराजी व्यक्त केली. तुमाने यांनी नागपूर विमानतळ तसेच रामटेक येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून राष्ट्रपतींचे स्वागत केले. मात्र, कामठीच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणे टाळले.
साधे निमंत्रणही नाही
राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या कार्यक्रमात स्थानिक खासदारांचे नाव समाविष्ट करणे आवश्यक असते. त्यानुसार राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे कामठी येथे आयोजित कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत खासदार म्हणून आपले नाव असणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. आपल्याला साधे निमंत्रणही देण्यात आले नाही. या अवमानाबद्दल सामाजिक न्याय विभागाच्या विरोधात संसदेत हक्कभंग प्रस्ताव सादर केला जाईल. लोकप्रतिनिधींचा सन्मान राखायलाच हवा.
- कृपाल तुमाने,
खासदार, रामटेक लोकसभा मतदारसंघ