मुलाखतीच्या नावाखाली देहविक्रयाच्या धंद्यात ढकलणारा नागपुरात गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 11:27 AM2018-04-27T11:27:15+5:302018-04-27T11:27:25+5:30
नोकरीची आॅनलाईन जाहिरात देऊन मुलाखतीला बोलविल्यानंतर सुस्वरूप तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलणाऱ्या एका आरोपीचा अकोल्याच्या तरुणीने (वय २३) बुरखा फाडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नोकरीची आॅनलाईन जाहिरात देऊन मुलाखतीला बोलविल्यानंतर सुस्वरूप तरुणींना देहविक्रयाच्या दलदलीत ढकलणाऱ्या एका आरोपीचा अकोल्याच्या तरुणीने (वय २३) बुरखा फाडला. तिने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे बेलतरोडी पोलिसांनी आरोपी नितीन आनंद पुरोहित (वय ४०) याला अटक केली.
आरोपी नितीन पुरोहित हा बेलतरोडीच्या श्यामनगरातील कृष्णा रेसिडेन्सीमध्ये राहतो. नावाला तो एका खासगी इन्शुरन्स कंपनीचे काम करतो. २०१ क्रमांकाच्या सदनिकेत त्याने कार्यालय थाटले आहे. तेथून त्याचा भलताच गोरखधंदा चालतो.
आधी सुस्वरूप तरुणींना नोकरीचे आमिष दाखवायचे आणि मुलाखतीला बोलवून घ्यायचे आणि नंतर तिला एका रात्रीत १० ते १५ हजार रुपये कमविण्याचा प्रस्ताव देऊन तिला देहविक्रयाच्या दलदलीत ढकलायचे, अशी नितीनची कार्यपद्धती आहे.
तक्रारदार तरुणी एलएलबीच्या तिसऱ्या वर्षाला शिकते. तिच्या काही मैत्रिणी रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गेल्या आणि नंतर बेपत्ता झाल्या. त्यांना देहविक्रय करवून घेणाऱ्या दलालांनी विकल्याचा संशय असल्याने या गोरखधंद्याचा पर्दाफाश करण्यासाठी ही तरुणी प्रयत्नरत होती. मोबाईल लोकेटरमधून तिने काही दिवसांपूर्वी एक जाहिरात बघितली. चांगल्या रोजगाराची त्यात हमी असल्याने तिने जाहिरातीत नमूद आरोपी नितीनच्या मोबाईलवर फोन केला. आरोपीने तिला आपल्या नागपुरातील कार्यालयात मुलाखतीसाठी बोलविले. त्यानुसार पीडित तरुणी बुधवारी दुपारी रेल्वेने अजनी स्थानकावर पोहचली. येथे आरोपी तिला घ्यायला आला. कारमधून तिला दोन तास इकडेतिकडे फिरविल्यानंतर सायंकाळी ५.१५ वाजता आरोपीने तिला आपल्या बेलतरोडीतील सदनिकेत नेले. काही वेळ बातचित केल्यानंतर आरोपीने सदनिकेचे दार बंद केले आणि तरुणीचा हात पकडून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. तुला एका रात्रीत १५ ते २० हजार रुपये मिळेल, असे आमिष दाखवून आरोपी नितीन तिच्याशी लज्जास्पद चाळे करीत होता. आरोपीचे एकूणच वर्तन व्हॉटस्अॅपवरील मेसेज बघून तिला त्याचा संशय आल्याने तरुणीने आधीच तयारी करून ठेवली होती. तिने अकोल्याचे नगरसेवक शशिकांत चोपडे यांना फोन करून हा प्रकार सांगितला. चोपडेंनी येथील सामाजिक कार्यकर्ते पंजू तोतवानी, शिवसेनेचे टिंकूसिंग दिगवा, युवा सेनेचे हितेश यादव यांना ही माहिती दिली. त्यांनी तरुणीला धीर देऊन हुडकेश्वर ठाण्यात पोहोचविले.
पोलीस ठाण्यात व्हॉटस्अॅप चॅटिंग
तरुणीच्या तक्रारीवरून हुडकेश्वरचे एपीआय आय.एस. हनवते यांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपी नितीनला पोलिसांनी अटक केली. अटकेपूर्वी पोलिसांनी काही वेळेसाठी आरोपी नितीनचा मोबाईल ताब्यात घेतला, नंतर मात्र त्याला तो परत केला. त्यानंतर तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्यापर्यंत आरोपी नितीन पोलीस ठाण्यात बसून बराचवेळ व्हॉटस्अॅप चॅटिंग करीत होता. पोलिसांनी त्याला ही मुभा कोणत्या प्रेमापोटी दिली, ते कळायला मार्ग नाही. दरम्यान, नितीनने अशाप्रकारे किती तरुणींना जाळ्यात ओढले, त्याची चौकशी व्हावी, अन्यथा आपण आंदोलन करू, अशी भूमिका पीडित तरुणीने घेतली आहे.