‘ तो मी नव्हेच...’ ची नागपुरात पुनरावृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:32 AM2019-04-22T11:32:13+5:302019-04-22T11:35:26+5:30
पतीपासून दूर असलेल्या, घटस्फोटित किंवा विधवा महिलांवर जाळे टाकून एका आरोपीने अनेकींच्या जीवनाचा खेळखंडोबा केल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे.
नरेश डोंगरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पतीपासून दूर असलेल्या, घटस्फोटित किंवा विधवा महिलांवर जाळे टाकून एका आरोपीने अनेकींच्या जीवनाचा खेळखंडोबा केल्याची संतापजनक माहिती पुढे आली आहे. महेंद्र दुर्योधन मेश्राम (वय ३४) नामक हा आरोपी आधी महिला-मुलींना भावनिकरीत्या जवळ करतो. त्यांच्याशी शरीरसंबंध जोडून, त्यांना लग्नाचे आमिष दाखवत गप्प करतो. नंतर बदनामीचा धाक दाखवत त्यांची कोंडी करतो आणि हे करतानाच तो त्यांच्याकडून दागिने अन् रक्कमही उकळतो. एखाद्या सिनेमातील कथानक वाटावे, असे हे धक्कादायक प्रकरण नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.
आरोपी मेश्राम हा मूळचा साकोली जवळच्या एकोली गावातील रहिवासी होय. १० वर्षांपूर्वी त्याने गावातील अनेकांना वेगवेगळ्या आकर्षक योजनांचे मृगजळ दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचे समजते. त्याच्या ठगबाजीचा भंडाफोड झाल्यानंतर तो गावातून नागपुरात पळून आला. येथे नंदनवनमध्ये त्याने मेस सुरू केली. मेसच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या महिला-मुलींसोबत तो सलगी साधतो अन् नंतर त्यांच्यावर आपले जाळे टाकतो, असा पीडितांचा आरोप आहे. सधन कुटुंबातील मात्र पतीपासून दुरावलेल्या किंवा घटस्फोटित तसेच विधवा महिलांना तो हेरतो. स्वत:ला मोठ्या फूड पार्सल कंपनी (रेस्टॉरंटचा) मालक असल्याचे सांगून तो त्यांना प्रभावित करतो. त्यांच्याशी सलगी साधल्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवायचे आणि त्यांच्याशी शरीरसंबंध जोडायचे. नंतर व्यवसायात तोटा आल्याचे सांगून त्यांच्याकडून रोख तसेच दागिने मागायचे आणि लग्नाचा तगादा लावताच त्यांना वाऱ्यावर सोडून पळून जायचे, अशी या मेश्रामची पद्धत असल्याचे पीडित महिलांनी सांगितले आहे. पीडित महिलांनी मेश्रामच्या कुकृत्याचे अनेक किस्से उघड केले. त्यानुसार, मिसकॉलच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील एका महिलेच्या संपर्कात आला. सधन कुटुंबातील या महिलेशी २००८ मध्ये सलगी साधल्यानंतर तो तिच्या तब्बल आठ वर्षे संपर्कात राहिला. या कालावधीत महिलेने त्याला रोख, दागिने दिलेच. चक्क ट्रक घेण्यासाठी पैसे दिले. पीडित महिलेच्या माहितीनुसार, त्याने तिला २५ ते ३० लाखांनी लुबाडले. एवढे सर्व असताना महिला बाहेरगावी गेल्याची संधी साधून त्याने तिच्या घरी दुसºयाच एका तरुणीला आणले. एक दिवस त्याने महिलेच्या शाळकरी मुलीसोबत चाळे केले. मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर त्याची विकृती तिच्या लक्षात आली. तेव्हा तो तेथून पळून गेला. तत्पूर्वी, याच महिलेच्या एका मैत्रिणीसोबत त्याने सूत जुळविले. ती ब्युटीशियन आहे. तिच्याकडूनही त्याने मोठी रक्कम लुबाडल्याचे या दोघींच्या चर्चेतून नंतर उघड झाले. हे करतानाच त्याने गोंदियातील एका घटस्फोटित महिलेशी संबंध जोडले. दुसरीकडे नंदनवनमधील एका विधवा महिलेला त्याने आपल्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून तिचे वर्षभर शारीरिक शोषण करतानाच त्याने तिच्याकडून दागिने आणि रक्कमही हडपली. याच दरम्यान गोंदियातील एका घटस्फोटित नोकरदार महिलेलाही त्याने जाळ्यात ओढल्याचे समजते. महिलांना धाकात ठेवण्याची त्याची अफलातून पद्धत असल्याचे पीडित सांगतात. त्याची मेस असल्याने अनेक पोलीस त्याच्याकडे जेवायला जातात. काहींना तो टीफिनही पुरवितो. त्यामुळे निर्माण झालेल्या संबंधाचा गैरफायदा घेत तो आपले पोलिसांसोबत किती घनिष्ट संबंध आहे, ते सांगतो. त्यामुळेच पीडित त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत दाखवत नाहीत. बलात्काराची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळेच मेश्रामला पळून जाण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला.
विकृतीचा भंडाफोड
तब्बल वर्षभर पत्नीसारखे वापरल्यानंतर दागिने, रक्कम घेऊन पळून जाणाऱ्या मेश्रामच्या दगाबाजीने क्षुब्ध झालेल्या विधवा महिलेने त्याच्या विकृतीचा भंडाफोड केला. तो लग्नासाठी टाळाटाळ करीत असल्यामुळे संशय आल्याने या महिलेने त्याच्या संपर्कातील काही महिला-मुलींचे संपर्क नंबर मिळवले होते. त्यांच्यातील काहींसोबत तिने संपर्क करून आरोपी मेश्रामच्या विकृतीची माहिती दिली. त्यामुळे त्याच्या कुकृत्याचा पर्दाफाश झाला. त्यानंतर सर्वच्या सर्वच जणींनी डोक्यावर हात मारून घेतला.
ठाण्यातच दाखवले चौदावे रत्न
आरोपी मेश्रामच्या जाळ्यात अनेक चांगल्या घरच्या महिला-मुली अडकल्याचा संशय आहे. त्याने ठगविलेल्या अनेक जणी बदनामीच्या धाकाने समोर यायला तयार नाहीत. मात्र, धोकेबाजी करून पळून गेल्यानंतर तो काही दिवसांपूर्वी ठाण्यात आल्याचे कळताच एक पीडित महिला ठाण्यात पोहचली. तिने त्याला चक्क ठाण्यातच मारले. विशेष म्हणजे, त्याच्या कुकृत्याची तक्रार पीडित महिलेने २६ मार्चला नंदनवन ठाण्यात नोंदवली. मात्र, तक्रारीत दम नसल्याचे सांगून पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे टाळले. एका पोलीस अधिकाऱ्याच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्यांनी नंदनवन ठाण्यात फोन करून विचारणा केली. तेव्हा शनिवारी पोलिसांनी आरोपी मेश्रामविरुद्ध बलात्काराचा आणि तिची रक्कम घेऊन विश्वासघात केल्याचा गुन्हा दाखल केला.