नागपुरात गुंडाचे अपहरण करून जंगलात केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 10:44 AM2020-06-15T10:44:17+5:302020-06-15T10:46:57+5:30
नागपुरात शनिवारी दुपारी २ वाजता ही अपहरणाची घटना घडली. तर, ३० तास झाल्यानंतर अपहृत तरुणाचा मृतदेह आढळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुंडांच्या एका टोळीने प्रतिस्पर्धी गुंडाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली. शनिवारी दुपारी २ वाजता ही अपहरणाची घटना घडली. तर, ३० तास झाल्यानंतर अपहृत तरुणाचा मृतदेह आढळला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
सनी दामोदर जांगीड (वय २०) असे अपहरण करून हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर हा गुन्हा करणाऱ्यापैकी प्रशील जाधव ऊर्फ मोनू रायडर आणि ललित रेवतकर या दोघांची नावे उघड झाली आहेत. तिसऱ्या आरोपीचे नाव अद्याप पुढे आले नाही. सनीची आई नंदा दामोदर जांगीड (वय ३९,रा. चंद्रनगर) यांनी शनिवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, सनी एका अंत्ययात्रेत गेला होता, नंतर तो परतच आला नाही. आरोपी मोनू आणि ललित या दोघांनी शनिवारी दुपारी २ च्या सुमारास सनीला फोन करून मानेवाड्यातील श्रीनगर क्रमांक-२ मध्ये बोलविले. सनी तेथे पोहचताच आरोपींनी त्याला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसवले. स्कुटीसारख्या दुचाकीवरील एका आरोपीने त्याला मागून पकडले तर दुसरा सनीच्या मांडीवर बसला. तिसऱ्या आरोपीने सुसाट वेगाने त्याला हुडकेश्वरमधील जंगलात नेले. त्यानंतर शस्त्राने घाव घालून निर्घृण हत्या केली.
हत्या करून फोन केला
सनीची हत्या करून आरोपींनी त्याच्या भावाला फोन केला. सनीचा गेम केला असून हुडकेश्वरच्या जंगलामध्ये त्याला फेकले, अशी माहिती आरोपीने नातेवाईकाला दिली. आम्ही एक तासात घरी येतो असेही आरोपींनी नातेवाईकाला सांगितले. रविवारी दुपारी ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हुडकेश्वरच्या जंगलात शोधमोहिम सुरू केली. रात्री ७ च्या सुमारास सनीचा मृतदेह पोलिसांना मिळाला.
आरोपी आऊट ऑफ रेंज
हा गुन्हा करणारे आरोपी मोनू, ललित रेवतकर आणि त्याचे साथीदार हे कुख्यात रामटेके टोळीचे गुंड आहेत. ते सराईत आहेत. सनीसुद्धा रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. कुख्यात गुंड दबणे याचा तो भाचा होय. दबने सध्या तडीपार आहे. आरोपींचे सनीसोबत अनेक दिवसांपासून शीतयुद्ध सुरू होते. त्यातूनच त्यांनी सनीचा गेम केला. गुन्हा केल्यानंतर त्यांनी आपापले मोबाईल बंद करून टाकले. परिणामी, आरोपी कुठे आहेत, ते पोलिसांना कळेनासे झाले आहे. आरोपीच्या संपर्कातील १० ते १५ लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून आरोपींबाबत विचारपूस सुरू केली.