जीटी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या व्यक्तीकडे आढळले ६० लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 08:24 PM2021-05-22T20:24:13+5:302021-05-22T20:28:21+5:30
In GT Express found Rs 60 lakh जीटी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या आणि पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील फूट ओव्हरब्रिजवरून जात असलेल्या एका संशयित व्यक्तीकडे ६० लाख रुपये आढळले. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी आयकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जीटी एक्स्प्रेसमधून उतरलेल्या आणि पूर्वेकडील संत्रा मार्केट भागातील फूट ओव्हरब्रिजवरून जात असलेल्या एका संशयित व्यक्तीकडे ६० लाख रुपये आढळले. संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी आयकर विभागाकडे सोपविण्यात आले आहे.
रेल्वे सुरक्षा दलाचे निरीक्षक आर. एल. मीना हे सिकंदर यादव, कामसिंह ठाकूर यांच्यासोबत शनिवारी सकाळी १०.१० वाजता प्लॅटफार्म क्रमांक ८ वर गस्त घालत होते. यावेळी पूर्वेकडील गेटने एक व्यक्ती मोठ्या ट्रॉलीबॅगसह संशयास्पद स्थितीत आढळला. ट्रॉलीबॅगमध्ये काय आहे याची विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. अधिक चौकशी केली असता बॅगमध्ये रोख रक्कम असल्याची माहिती त्याने दिली. त्याने आपले नाव शब्बीर हुसेन हसन अली कारंजावाला (५५) रा. घर क्रमांक ८५८, इतवारी रोड राजा मशीदजवळ, बंगाली पंजा असे सांगितले. त्यास आरपीएफ ठाण्यात आणून चौकशी केली असता, त्याने आपण इस्माईल अँड सन्स पाचपावली रोड गांजाखेत चौक येथे नोकरी करीत असल्याची माहिती दिली. इटारसी रेल्वेस्थानकावरून जीटी एक्स्प्रेसने (कोच क्रमांक बी-२, बर्थ ३८) इस्माईल अँड सन्सची रोख रक्कम घेऊन आपण आलो असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोन पंचांसमक्ष त्याच्या बॅगची तपासणी केली असता, त्यात ५०० रुपयाच्या १२ हजार नोटा म्हणजे ६० लाख रुपये, ४९ कागदपत्रे आणि प्रवासाचे तिकीट आढळले. दरम्यान, जप्त केलेली रक्कम, कागदपत्रांसह संबंधित व्यक्तीला आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.