जरा हटके! निसर्गसंवर्धनासाठी झटतोय एक अवलिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 11:26 AM2019-09-27T11:26:49+5:302019-09-27T11:28:47+5:30
प्लास्टिक वापरू नका, कुठेही कचरा फेकू नका, पेट्रोलचा अमर्याद वापर टाळा, वृक्षसंवर्धन करा, असा संदेश देत एक बुकलेट प्रवाशांच्या हाती सोपवितो आणि क्षणात निघून जातो. संजय आगरकर असे या सामान्य पण अवलिया माणसाचे नाव.
निशांत वानखेडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एसटी बसमध्ये प्रवाशांचे लक्ष वेधून अनेक फेरीवाले पुस्तके , कपडे व विविध प्रकारचे साहित्य विकत असतात. पण या फेरीवाल्यांप्रमाणेच बसमध्ये चढून तुमचे लक्ष वेधणारा एक माणूस भेटेल जो यातील काही विकत नाही. तो सांगतो निसर्ग जोपासण्याचा मंत्र, तो विकतो भविष्य सुरक्षित ठेवण्याची आशा. लोकहो, निसर्गच सर्वश्रेष्ठ निर्माता आहे, पण आपणच निसर्गाची अवहेलना केली असून आपल्यापुढे पर्यावरणाचं संकट निर्माण झालं आहे. आपल्याला भविष्य सुरक्षित करायचं असेल तर निसर्गाचे जतन केले पाहिजे, प्लास्टिक वापरू नका, कुठेही कचरा फेकू नका, पेट्रोलचा अमर्याद वापर टाळा, वृक्षसंवर्धन करा, असा संदेश देत एक बुकलेट प्रवाशांच्या हाती सोपवितो आणि क्षणात निघून जातो. हा अवलिया माणूस अचानक बसमध्ये भेटला आणि त्याच्याबाबत वाचकांना सांगण्याची गरज वाटली. संजय आगरकर असे या सामान्य पण अवलिया माणसाचे नाव.
संजय आगरकर हे शिक्षणाने भूवैज्ञानिक आणि पेशाने मायनिंग क्षेत्रात खासगी सल्लागार आहेत. पण गेल्या २९ वर्षापासून ते अशाच प्रकारे प्रबोधनाचे काम करतात, हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. खरतर याची सुरुवात झाली ती १९९० मध्ये. संजय यांच्या घरचे वातावरण धार्मिक व आध्यात्मिक स्वरुपाचे होते. घरच्या संस्कारामुळे त्यांच्यावरही आध्यात्मिक प्रभाव पडला. प्रभावातून त्यांनी सुरुवातीला व्यसनमुक्तीसाठी काम सुरू केले. कुठल्याही संस्थेशी न जुळता स्वत:च शाळा महाविद्यालयात जायचे आणि तेथील प्रमुखांना विनंती करून विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश द्यायचे. स्वत:च्या कामातून वेळ काढत स्वत:च्या खर्चाने त्यांनी शेकडो शाळांना भेटी देत जनजागृती चालविली.
पण धर्म काय, ईश्वर कोण हे जाणण्याचे कुतुहल त्यांच्या मनात होते. यावर त्यांनी अभ्यास केला आणि ईश्वर नाही तर निसर्ग महत्त्वाचा आहे, हे त्यांना जाणवले. निसर्गाने ही सृष्टी, सजीव आणि मानवप्राणी निर्माण केले व माणसाने ईश्वराची निर्मिती केली, ही आत्मोन्नती त्यांना झाली. पण माणसाने हव्यासापायी निसर्गाची अवहेलना चालविली असून यामुळे ही धरा नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. जगभरात वैज्ञानिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून यावर चिंता व्यक्त करून कार्य केले जात आहे. या कार्यात माणूस म्हणून आपलेही काही योगदान असावे, हा विचार डोक्यात आला आणि पुढे व्यसनमुक्तीसह निसर्ग संवर्धनाबाबत जनजागृतीचे काम त्यांनी सुरू केले.
हे करताना २००७ मध्ये त्यांनी नोकरीही सोडून दिली आणि खासगी सल्लागार म्हणून काम सुरू केले. त्यांची पत्नी शासकीय नोकरी करीत असून मुलाचेही शिक्षण पूर्ण झाले आहे.
पत्नीच्या सहकार्यामुळे हे काम शक्य होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
दररोज २०० ते ३०० लोकांना भेटतात
आगरकर यांनी सुरुवातीला शाळा-महाविद्यालयात मार्गदर्शन करण्याचे काम चालविले. पण अनेकदा शाळांमध्ये तासिकांचे अडथळे, नकार मिळायचा. त्यामुळे लोक सहज भेटतील अशा बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर जनजागृती सुरू केली. याशिवाय कुठले मेळावे, लग्न समारंभातही ही जागृती मोहीम सुरू झाली. दररोज २०० ते ३०० लोकांना भेटून हा संदेश देणे हे त्यांचे लक्ष्य. लोकांना सांगता येत नाही म्हणून त्यांनी स्वखर्चाने बुकलेट, पॉम्प्लेट छापले आणि वितरित करणे सुरू केले. माणसाने निसर्गाचा ºहास चालविला आहे. प्रचंड वृक्षतोड व कचऱ्याच्या समस्येमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे. यामुळे तापमानवाढ, पावसाची अनियमितता दिसून येते. माणसाने आपल्या सवयी बदलल्या तर प्रदूषणावर नियंत्रण मिळविता येते. यासाठी कचरा वेगवेगळा साठवा, कुठेही फेकू नका, प्रवासात जाताना कापडी पिशवी सोबत ठेवा व प्लास्टिकचे पाऊच, उरलेले खाद्यपदार्थ त्यात साठवून व्यवस्था असेल तिथे फेका, फटाके फोडू नका असा संदेश देत जल, वायू, अग्नी, पृथ्वी व आकाश या पंचतत्त्वाचे संवर्धन करा, असे आवाहन ते लोकांना करीत असतात.