संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास
By आनंद डेकाटे | Published: May 21, 2024 05:13 PM2024-05-21T17:13:55+5:302024-05-21T17:14:26+5:30
अंनिसचे संघटक पंकज वंजारे : युवा व्यक्तिमत्व - वक्तृत्व, कौशल्य प्रशिक्षण कार्यशाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संतांनी आपल्या साहित्यातून आनंदी जीवन जगण्याचे मार्ग आणि तत्वज्ञान दिले आहे. ज्याची आजच्या पिढीला नितांत गरज असून संत साहित्यातूनच तरुणांचा व्यक्तिमत्व विकास होतो, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य युवा संघटक तथा प्रसिद्ध वक्ते पंकज वंजारे यांनी केले.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग येथे 'राष्ट्रसंतांच्या मूल्यांतील व्यक्तिमत्व - संवाद कौशल्य विकास' या विषयावर तीन दिवसीय युवा प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. शताब्दी महोत्सवी वर्षा निमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि विदर्भ युथ ऑर्गनाईजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेत प्रशिक्षक म्हणून वंजारे मार्गदर्शन करीत होते. यावेळी मंचावर विद्यापीठाचे आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. प्रशांत कडू, पदव्युत्तर गांधी विचारधारा विभाग प्रमुख डाॅ. प्रमोद वाटकर, डॉ. धनंजय सोनटक्के उपस्थित होते.
वंजारे यांनी 'संतांचा जीवन दृष्टीकोन, वेळ, करिअरचे व्यवस्थापन' या विषयावर मार्गदर्शन करताना संत कबीर , संत रोहीदास, ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत रामदास , राष्ट्रसंत तुकडोजी, गाडगे महाराज यांच्या साहित्यातील दाखले देत संत कोणाला म्हणावे हे पटवून दिले. संत ज्ञानेश्वर माऊली ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या पर्यंत संतांनी समाजात मानवी मूल्ये रुजवली आहे. संतांनी कोण्या एका जाती, धर्माची कास धरली नाही. कर्म हाच मनुष्याचा धर्म असल्याचे संत रविदास यांनी सांगितले होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी तर २५०० बुद्ध जयंती साजरी करताना नागरिकांना समयदान मागितले होते. संत प्रचंड क्रांतिकारक होते. संतांनी जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ज्ञान वाटण्याचे आवाहन केले होते. संतांनी समाज सुधारणा केली. समाजाला दिशा देण्याचे काम संतांनी केल्याचे वंजारे म्हणाले.