नागपूर विद्यापीठात ‘पेट-२’ होणार बंद; ‘पीएचडी’, ‘एमफिल’चे नियम बदलणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 01:03 PM2019-08-30T13:03:57+5:302019-08-30T13:04:19+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’, ‘एमफिल’ करणे सोपे होणार आहे. यासंबंधातील दिशानिर्देशांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.
आशीष दुबे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘पीएचडी’, ‘एमफिल’ करणे सोपे होणार आहे. यासंबंधातील दिशानिर्देशांमध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. नियमांची समीक्षा करण्यासाठी बनविण्यात आलेल्या समितीने ‘पेट-२’ बंद करण्यासोबत अनेक शिफारशी केल्या आहेत. यासंबंधातील अहवाल लवकरच कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना सोपविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, जर नवीन नियम लागू झाले तर याचा फायदा पुढील शैक्षणिक सत्रात ‘पेट’मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना होईल. ‘पीएचडी’, ‘एमफिल’, ‘डीलिट’ व ‘डीएस्सी’च्या नियमांसंदर्भात विद्यापीठात बºयाच काळापासून वाद सुरू होता. त्यामुळे विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने डॉ.दिलीप पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली.
समितीने ‘पीएचडी’, ‘एमफिल’, ‘डीलिट’ व ‘डीएस्सी’शी निगडित नियमांमध्ये बदल केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘डायरेक्शन ३२ आॅफ २०१९’ च्या २९ पैकी १६ नियमांत बदल करण्यात आला आहे. काही आणखी नियमांना बदलण्याचे काम सुरू आहे.
समितीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. दोन बैठका आणखी होतील. या बैठकांमध्ये अहवालाला अंतिम रूप देण्यात येईल. विद्यापीठात संशोधनाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे संशोधन केंद्रांचीच संख्या वाढण्याची शक्यता आहे. ‘पेट-२’ कठीण असल्याने अनेक उमेदवार नोंदणीसाठी पात्र ठरण्यास अपयशी ठरले; शिवाय मार्गदर्शकांची समस्या आहेच. यामुळे अनेक विषयांत तर संशोधनच होत नसल्याचे चित्र
आहे.
बदल होणे सोपे नाही
यासंबंधात विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी नियमांत बदल करणे सोपे नसल्याचे स्पष्ट केले. समिती जी शिफारस करेल ती लागू होईलच, असे नाही. समितीच्या अहवालाला अगोदर विद्वत परिषद व त्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरी मिळणे आवश्यक ठरणार आहे.