विद्यापीठातून संपणार पेट : पीएचडी नोंदणीपूर्वी होणार एकच परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 10:24 PM2020-11-05T22:24:52+5:302020-11-05T22:27:12+5:30
PET will end from university for PhD राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. विद्यापीठ पीएचडी नोंदणी पूर्वीची पूर्व प्रवेश परीक्षा (पेट) च्या नियमात बदल करणार आहे. त्यानुसार पेट-२ ची तरतूद रद्द करण्याचा विचार सुरु आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. विद्यापीठ पीएचडी नोंदणी पूर्वीची पूर्व प्रवेश परीक्षा (पेट) च्या नियमात बदल करणार आहे. त्यानुसार पेट-२ ची तरतूद रद्द करण्याचा विचार सुरु आहे. गुरुवारी नव्या पीएचडी अध्यादेश तयार करणाऱ्या समितीची बैठक सुरू झाली आहे. शुक्रवारी नवा अध्यादेश जारी होण्याची शक्यता आहे.
पीएचडीच्या नोंदणीसाठी नवा अध्यादेश तयार करण्यासाठी विद्यापीठाने दोन समित्यांचे गठन केले होते. एक समिती विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे वरिष्ठ सदस्य डॉ. राजेश भोयर व दुसरी समिती डॉ. दिलीप पेशवे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती. दोन्ही समित्यांनी आपला अहवाल विद्यापीठाकडे सोपविला आहे. समितीच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी तसेच नवा अध्यादेश तयार करण्यासाठी बैठक सुरू झाली आहे. बैठक दीर्घकाळ चालल्यामुळे गुरुवारी निर्णय होऊ शकला नाही. विद्यापीठ प्रशासनानुसार शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या अध्यादेशाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार समितीने संशोधनाला चालना देण्यासाठी पेट-१ ला कायम ठेवून पेट-२ च्या तरतुदीला रद्द करण्याची शिफारस केली आहे. समितीच्या मते पेट २ च्या तरतुदीमुळे विद्यापीठात संशोधन कार्य कमी होत आहे. मोठ्या संख्येने संशोधक पीएचडीसाठी अर्ज करतात. परंतु पेट २ च्या तरतुदीमुळे खूप कमी विद्यार्थी यात यशस्वी होतात. यामुळे पेट २ ची तरतूद रद्द करण्याची शिफारस आहे. याशिवाय तीन मोठे बदल समितीने आपल्या अहवालात सुचविले आहेत. बैठकीत नव्या अध्यादेशाला मंजुरी मिळाल्यास पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
चर्चा सुरू आहे
समितीच्या अहवाल आणि शिफारशीवर चर्चा सुरु आहे. शुक्रवारी पुन्हा बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत अंतिम मंजुरी मिळणार आहे. समितीचा अहवाल आणि शिफारशी पूर्णपणे लागू करण्यास मंजुरी मिळेल.
-डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ