‘एअर फेस्ट’विरुद्धची याचिका फेटाळली
By admin | Published: September 26, 2015 03:01 AM2015-09-26T03:01:51+5:302015-09-26T03:01:51+5:30
भारतीय वायुसेनेच्या ८३ व्या वर्धापनदिवसानिमित्त २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वायुसेनानगर येथील मुख्यालयात ‘एअर फेस्ट-२०१५’ हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे.
हायकोर्ट : याचिकाकर्त्याच्या दाव्यात आढळले नाही तथ्य
नागपूर : भारतीय वायुसेनेच्या ८३ व्या वर्धापनदिवसानिमित्त २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता वायुसेनानगर येथील मुख्यालयात ‘एअर फेस्ट-२०१५’ हा एअर शो आयोजित करण्यात आला आहे. याविरुद्ध दाखल जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी विविध बाबी लक्षात घेता फेटाळून लावली.
हरेंद्र हंसराज वेद असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते विमा एजन्ट आहेत. हा एअर शो वायुसेनानगर येथील मुख्यालयात करणे धोकादायक आहे. या ठिकाणी अपघात झाल्यास मोठी प्राणहानी होईल. एअर शो स्थळाच्या सभोवताल दाट लोकवस्ती आहे. एअर शोसाठी स्थळ निवडताना परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करण्यात आला नाही.
एअर शोमध्ये हेलिकॉप्टरसह विविध प्रकारच्या विमानांच्या कवायती सादर करण्यात येणार आहेत. यामुळे हा एअर शो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे स्थानांतरित करण्यात यावा असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. सहायक सॉलिसिटर जनरल रोहित देव यांनी एअर व्हॉईस मार्शल प्रवीण भट यांच्याशी चर्चा केल्यानंतर याचिकाकर्त्याची भीती निरर्थक असल्याचे सांगितले. अशा प्रकारचा उपक्रम प्रजासत्ताक दिवसाला दरवर्षी आयोजित करण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती व इतर न्यायमूर्ती, केंद्रीय मंत्री, मित्र देशांतील प्रतिनिधी आदी अतिविशेष व्यक्ती उपस्थित असतात याकडे त्यांनी लक्ष वेधले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. पी.व्ही. कुलकर्णी व अॅड. एस.के. साबळे तर, राज्य शासनातर्फे अतिरिक्त सरकारी वकील एस.एम. उके यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)