'भूविज्ञान'मध्ये आर्थिक घोटाळ्याचा आरोप करणारी याचिका फेटाळली
By राकेश पांडुरंग घानोडे | Published: May 10, 2024 07:28 PM2024-05-10T19:28:12+5:302024-05-10T19:28:43+5:30
हायकोर्टाचा निर्णय : अमृत महोत्सवी समारंभाचे प्रकरण
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भूविज्ञान विभागाच्या अमृत महोत्सवी समारंभासाठी मिळालेल्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी हा निर्णय दिला.
भूविज्ञान विभागाचे माजी विद्यार्थी व गोंडवाना भूवैज्ञानिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंजनकुमार चॅटर्जी यांनी ही याचिका दाखल केली होती. २०२१-२२ मध्ये साजरा झालेल्या या समारंभासाठी चॅटर्जी यांनी देणगी दिली होती. भूविज्ञान विभाग प्रमुख डॉ. के. आर. रणदिवे यांनी समारंभाचा निधी नियमानुसार खर्च केला नाही. त्यांनी निधीमध्ये गैरव्यवहार केला. करिता, विशेष समिती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, असे चॅटर्जी यांचे म्हणणे होते. परंतु, न्यायालयाला नियमाची पायमल्ली व आर्थिक घोटाळा झाल्याचे ठोस पुरावे रेकॉर्डवर आढळून आले नाही. उलट, चॅटर्जी यांनी रणदिवे यांच्यासोबत असलेल्या वैयक्तिक वादामुळे ही याचिका दाखल केल्याचे दिसून आले. यासंदर्भात चॅटर्जी यांचा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयामध्येही दावा प्रलंबित आहे. परिणामी, ही याचिका फेटाळण्यात आली.