हिंगणा अध्यक्षाविरुद्धचा अर्ज खारीज : नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 08:47 PM2019-08-06T20:47:05+5:302019-08-06T20:49:55+5:30
हिंगणा नगर पंचायतच्या अध्यक्षा छाया भोसकर यांच्यासह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फेटाळून लावला आहे. सदस्यांमध्ये रेखा खापरे व वनिता नान्होरे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटप्रमुख गुणवंता चामाटे यांनी हा अर्ज दाखल केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:हिंगणा नगर पंचायतच्या अध्यक्षा छाया भोसकर यांच्यासह दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यासाठी दाखल अर्ज जिल्हाधिकाऱ्यांनी फे टाळून लावला आहे. सदस्यांमध्ये रेखा खापरे व वनिता नान्होरे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटप्रमुख गुणवंता चामाटे यांनी हा अर्ज दाखल केला होता.
भोसकर, खापरे व नान्होरे यांना महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता अधिनियम व महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अनर्हता नियम याअंतर्गत अपात्र ठरविण्यात यावे, असे चामाटे यांचे म्हणणे होते. सुनावणीच्या वेळी भोसकर यांचे वकील अॅड. महेश धात्रक यांनी अर्जावर तांत्रिक आक्षेप घेतला. अधिनियमानुसार, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांचाच स्थानिक प्राधिकरणात समावेश होतो. त्यात नगर पंचायतचा उल्लेख नाही. त्यामुळे हा अधिनियम नगर पंचायतला लागू होत नाही. परिणामी, भोसकर, खापरे व नान्होरे यांना अपात्र ठरवले जाऊ शकत नाही, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी हा युक्तिवाद मान्य केला.
चामाटे, भोसकर, खापरे व नान्होरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून विजयी झाले आहेत. चामाटे यांनी गटप्रमुख या नात्याने भावना पुंड यांना अध्यक्षपदाकरिता प्रस्तावित केले होते. असे असताना भोसकर यांनी हिंगणा विकास आघाडी गटाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. खापरे, नान्होरे व अन्य एका सदस्याच्या मतामुळे त्या विजयी झाल्या. तसेच, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी गटाचा आदेश पाळला नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्याची विनंती अर्जात करण्यात आली होती.