पेट्रोल मिळू शकेल ६७ रु. लिटर; विंडफॉल टॅक्सला तेल कंपन्यांचा विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 12:43 AM2018-05-26T00:43:16+5:302018-05-26T00:43:16+5:30
पेट्रोल/डिझेलच्या किमतीचा भडका उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेत आणण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर ग्राहकांना पेट्रोल अंदाजे रु. ६७ प्रति लिटर मिळू शकते, असे तेल रिफायनरीतील सूत्रांनी सांगितले.
सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल/डिझेलच्या किमतीचा भडका उडालेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम उत्पादनांना जीएसटी कक्षेत आणण्याची सूचना केली आहे. तसे झाले तर ग्राहकांना पेट्रोल अंदाजे रु. ६७ प्रति लिटर मिळू शकते, असे तेल रिफायनरीतील सूत्रांनी सांगितले.
शुद्धीकरणासाठी पेट्रोलपेक्षा जास्त खर्च येत असल्याने डिझेलची किंमत पेट्रोलपेक्षा जास्त होऊ शकते. परंतु डिझेलवरील अधिभार रद्द करून किमती पेट्रोलपेक्षा कमी ठेवण्याचा सरकार प्रयत्न करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
आज कच्च्या तेलाचे भाव २ डॉलरनी कमी होऊन ७८ डॉलर प्रति बॅरल आहेत. या भावाने एक लिटर पेट्रोल रिफायनरीला ३९.६० रुपयात पडेल. त्यावर २८ टक्के जीएसटी, २० टक्के सरचार्ज, ५ रुपये वाहतूक खर्च व ३.६० डिलर (पेट्रोल पंप मालकांचा) नफा आकारला तर पेट्रोल ग्राहकांना रु. ६७.२० मध्ये मिळू शकते. रिफायनरीला डिझेल ४१.५० मध्ये पडेल व त्यावर २८ टक्के जीएसटी, २० टक्के सरचार्ज, ५ रुपये वाहतूक खर्च व २.५० डिलर मार्जिन आकारून ग्राहकांना डिझेल ६८.९० मध्ये पडेल. पण डिझेलमुळे सर्वच उत्पादनांचा वाहतूक खर्च वाढतो व महागाई वाढते म्हणून सरकार डिझेलवरील सरचार्ज रद्द करू शकते. तसे झाले तर डिझेल ६० रुपये लिटर होईल, असेही सूत्रांनी सांगितले.
पेट्रोलियम उत्पादने सध्या जीएसटी कक्षेबाहेर आहेत. पण २९ पैकी २१ राज्यात भाजपची सत्ता आहे हे लक्षात घेता ती जीएसटीच्या कक्षेत आणणे सहज शक्य आहे. राज्य सरकारांना तसा ठराव करून जीएसटी कौन्सिलकडे पाठवावा लागेल. पेट्रोल/डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकार विंडफॉल टॅक्स आणण्याचा विचार करत आहे. पण तिन्ही तेल कंपन्यांचा त्याला विरोध आहे.
पेट्रोलचा जीएसटीमध्ये दर
१) रिफायनरी किंमत ३९.६०
२) जीएसटी २८% ११.१०
३) सरचार्ज २०% ७.९०
४) वाहतूक खर्च ५.००
५) डिलरचे मार्जिन ३.६०
६७.२०
अंदाजे किंमत - बदल संभव
डिझेलचा जीएसटीमध्ये दर
१) रिफायनरी किंमत ४१.५०
२) जीएसटी २८% ११.६०
३) सरचार्ज २०% ८.३०
४) वाहतूक खर्च ५.००
५) डिलरचे मार्जिन २.५०
६८.९०
अंदाजे किंमत - बदल संभव