-तर लिटरमध्येच घ्यावे लागणार पेट्रोल-डिझेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:45 AM2019-04-18T10:45:22+5:302019-04-18T10:47:08+5:30
पेट्रोल पंपावर ५०, १००, ५०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत असाल तर तुम्हाला भविष्यात असे करता येणार नाही. तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल लिटर मापातच खरेदी करावे लागेल.
कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल पंपावर ५०, १००, ५०० रुपयांचे पेट्रोल आणि डिझेल खरेदी करीत असाल तर तुम्हाला भविष्यात असे करता येणार नाही. तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल लिटर मापातच खरेदी करावे लागेल. राज्य वैधमापनशस्त्र विभागाने पेट्रोलियम कंपन्यांना पत्र पाठवून लिटरनुसार पेट्रोल आणि डिझेल विकण्यास सांगितले आहे.
विभागाचे उपनियंत्रक एस. एस. काकडे यांनी या महिन्यात बीपीसीएल, एचपीसीएल आणि आयओसीएल या तिन्ही कंपन्यांना पत्र पाठविले आहे. या पत्रात पेट्रोल आणि डिझेलची लिटरमध्ये विक्री करावी आणि मशीनला रुपये आकड्यांमध्ये सेट करावे, असे पेट्रोल डीलर असोसिएशन फॅमफेडाने तक्रारीत म्हटल्याचे नमूद केले आहे. लीगल मेट्रोलॉजी नियमानुसार पेट्रोल आणि डिझेल पैशाच्या हिशेबानुसार नव्हे तर लिटरमध्ये विकावे, असे पत्रात म्हटले आहे. या आधारावर पेट्रोलियम कंपन्यांना लिटरच्या हिशेबात विक्री करण्यास सांगितले आहे.
दुसरीकडे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत केले आहे. असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, पंपावरील मशीनचे सेटिंग लिटरनुसार करण्यात येते. पैशाच्या हिशेबाने पेट्रोल आणि डिझेल भरल्यास डीलर्सचे नुकसान होते. अनेक ग्राहक २० वा ३० रुपयांचे पेट्रोल मागतात. त्यामुळे वेळ आणि मानवी श्रम वाया जाते. लिटरनुसार विक्री करण्याचा नियम आहे. मशीनचे सेटिंग त्याच हिशेबात असते.
सर्व काही लिटरमध्ये
वैधमापनशास्त्र विभागाचे सहायक नियंत्रक हरिदास बोकडे म्हणाले,पेट्रोल आणि डिझेलची सर्व मानके लिटरमध्ये आहेत. किमतीपासून स्टॅम्पिंग लिटरमध्ये होते. ग्राहक दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या जनजागृती अभियानात ग्राहकांना लिटरमध्ये खरेदी करण्याचे आवाहन करण्यात येते. याच आधारावर पत्र लिहिण्यात आले आहे. यावर पेट्रोलियम कंपन्यांना निर्णय घ्यायचा आहे. सध्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरदिवशी किमतीत होणाºया चढ-उतारामुळे ग्राहकसुद्धा पेट्रोल-डिझेलची खरेदी ही समस्या समजतात, असे त्यांनी मान्य केले.
चिल्लरचे संकट उद्भवणार
लिटरने पेट्रोल आणि डिझेल भरल्यास चिल्लरचे संकट उद्भवणार आहे. बुधवारी पेट्रोल प्रति लिटर ७९ रुपये ५ पैसे होते. जर कुणी लिटरने पेट्रोल भरल्यास त्याला ९५ पैसे परत देणे कठीण होईल. त्यामुळे वेळ वाया जाईल. अशास्थितीत लिटरने विक्री अनिवार्य करण्यासाठी आधी पेट्रोल आणि डिझेलची किंमत रुपयांत ठेवण्याचा नियम करावा, असे असोसिएशनचे मत आहे.