नागपुरात पेट्रोल ९९.१८ रुपये, शंभरी लवकरच गाठणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 10:04 PM2021-05-21T22:04:56+5:302021-05-21T22:06:57+5:30
Petrol hike पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ ते २१ मेदरम्यान पेट्रोल प्रति लिटर २.३८ रुपये आणि डिझेल २.९९ रुपयांनी वाढले आहे. शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर ९९.१८ रुपये आणि डिझेलची ८९.५२ रुपये दराने विक्री झाली. सततच्या दरवाढीने साधे पेट्रोल लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे. पॉवर पेट्रोल प्रति लिटर १०२.४४ रुपये आहे, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ५ ते २१ मेदरम्यान पेट्रोल प्रति लिटर २.३८ रुपये आणि डिझेल २.९९ रुपयांनी वाढले आहे. शुक्रवारी पेट्रोल प्रति लिटर ९९.१८ रुपये आणि डिझेलची ८९.५२ रुपये दराने विक्री झाली. सततच्या दरवाढीने साधे पेट्रोल लवकरच शंभरी गाठण्याची शक्यता आहे. पॉवर पेट्रोल प्रति लिटर १०२.४४ रुपये आहे, हे विशेष.
निवडणुकांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर १८ दिवस स्थिर राहिल्यानंतर ५ मेपासून दरवाढ पुन्हा सुरू झाली. मध्यंतरी पेट्रोलचे दर सव्वा रुपयांनी कमी झाल्यानंतर सर्वसामान्यांना थोडाफार दिलासा मिळाला होता. पण ५ मेपासून दरवाढ पुन्हा सुरू झाली. ५ मे रोजी पेट्रोल ९६.८० आणि डिझेल ८६.५३ रुपयांवर पोहोचले. ६ मे रोजी पेट्रोल व डिझेलमध्ये अनुक्रमे २८ पैसे व २१ पैशांची वाढ होऊन पेट्रोल ९७.०८ रुपये व डिझेल ८६.७४ रुपये, ७ मे रोजी पुन्हा दरवाढ होऊन पेट्रोल ९७.२२ रुपये आणि डिझेल ८७.०५ रुपयांवर गेले. ८ मे रोजी पेट्रोल ९७.४९ रुपये तर ९ मे रोजी दर स्थिर होते. याशिवाय १० मे रोजी ९७.७४ रुपये, १२ ला ९८, १३ ला ९८.२४, १५ ला ९८.५१ आणि १७ मे रोजी पेट्रोलचे दर ९८.७४ रुपयांवर पोहोचले. याशिवाय १८ मे रोजी ९९ रुपये, १९ व २० मे रोजी दर स्थिर आणि २१ मे रोजी पेट्रोलचे दर ९९.१८ रुपयांवर पोहोचले. याशिवाय गेल्या तीन दिवसात डिझेलच्या दरात ७२ पैशांची वाढ झाली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याने महागाईत वाहनचालकांना फटका बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश केल्यास राज्य आणि केंद्राचे अनावश्यक कर लागणार नाहीत आणि इंधनाचे दर कमी होतील व स्थिर राहतील, असे मत ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.