पेट्रोल नव्वदीकडे! १५ दिवसांत १.४० रुपयांची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:53 AM2020-08-31T10:53:40+5:302020-08-31T10:54:03+5:30
१५ दिवसात लिटरमागे १.४० रुपयांची वाढ झाली असून दरदिवशी दरात २० ते ३० पैशांची भर पडत आहे. रविवारी पेट्रोल ८९.२३ रुपये होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सर्वसामान्यांचा कळीचा विषय असलेले पेट्रोलचे भाव दरदिवशी वाढतच आहे. १५ दिवसात लिटरमागे १.४० रुपयांची वाढ झाली असून दरदिवशी दरात २० ते ३० पैशांची भर पडत आहे. रविवारी पेट्रोल ८९.२३ रुपये होते. पेट्रोलची नव्वदीकडे वाटचाल सुरू असून चार महिन्यात जवळपास १२ रुपयांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय दरानुसार देशांतर्गत स्थानिक बाजारात पेट्रोलच्या किमतीत चढउतार होते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या निर्णयानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दरदिवशी रात्री १२ वाजता बदलतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी आहे, पण देशात पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी आणि राज्यांतर्गत व्हॅटची जास्त आकारणी होत असल्याने उत्पादन किमतीपेक्षा दुप्पट किंमत आहे. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. सरकार कराच्या स्वरुपात सामान्यांच्या खिशातून पैसे काढत आहे. लॉकडाऊनमध्ये प्रति लिटर ६७ रुपयांवर असलेल्या डिझेलची रविवारी प्रति लिटर ८०.७१ रुपये दराने विक्री झाली.
लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने अबकारी कर वाढविल्यानंतर राज्य शासनाने जून महिन्यात पेट्रोलवर २ रुपये सेस आकारला. विविध करांमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.