पेट्रोल दराचे ‘तीन तेरा’

By admin | Published: August 27, 2015 02:36 AM2015-08-27T02:36:54+5:302015-08-27T02:36:54+5:30

सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या कंपन्यांच्या पेट्रोलच्या दरात बरीच तफावत आहे. नागपुरात दोन कंपन्यांच्या प्रति लिटर दरात २० पैशांचा फरक असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

Petrol Price | पेट्रोल दराचे ‘तीन तेरा’

पेट्रोल दराचे ‘तीन तेरा’

Next

उपराजधानीत तफावत का ? ग्राहकांना फटका समान दराची मागणी
मोरेश्वर मानापुरे नागपूर
सार्वजनिक क्षेत्रातील तीन मोठ्या कंपन्यांच्या पेट्रोलच्या दरात बरीच तफावत आहे. नागपुरात दोन कंपन्यांच्या प्रति लिटर दरात २० पैशांचा फरक असून त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. शहरात पेट्रोलचे समान दर असावेत, अशी ग्राहकांची मागणी आहे.
कंपन्या ठरवितात पेट्रोलचे दर
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडीनुसार दर १५ दिवसांनी पेट्रोलच्या दरात कपात किंवा वाढ होत असते. त्यानुसार त्या त्या राज्यांची आणि शहरांची करआकारणी करून पेट्रोलचे दर कंपन्या निश्चित करतात. कंपन्यांनी निश्चित केलेल्या दरानुसारच पेट्रोलची विक्री करतो.
हरविंदरसिंग भाटिया, अध्यक्ष,
विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन.
प्रति लिटर २० पैशांची तफावत
देशात मुख्यत्वे हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम या तीन कंपन्या (स्वतंत्र कार्यभार) कार्यरत आहेत. दोन वर्षांपूर्वी तिन्ही कंपन्यांच्या पेट्रोलचे दर संपूर्ण देशात त्या त्या शहरानुसार कर आकारणीनंतर समान होते. दरवाढ किंवा दरकपात झाल्यानंतरही हे दर समान राहायचे. त्यामुळे ग्राहक मार्गात दिसेल त्या पंपावर पेट्रोल भरायचे आणि आताही तीच पद्धत आहे. पण जवळपास दोन वर्षांपासून तिन्ही कंपन्यांच्या पेट्रोलच्या दरात त्या त्या शहरानुसार तफावत दिसत आहे. नागपुरात पेट्रोलच्या दराची शहानिशा केली असता हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर पेट्रोलचे प्रति लिटर दर ७०.३१ रुपये, इंडियन आॅईल कॉर्पोरेशन ७०.३७ रुपये आणि भारत पेट्रोलियमच्या पंपांवर ७०.५१ रुपये आहेत. अर्थात तिन्ही कंपन्यांच्या तुलनेत हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचे पेट्रोल इंडियनपेक्षा ६ पैशांनी तर भारत पेट्रोलियमपेक्षा २० पैशांनी स्वस्त आहे. दरातील फरकाचा विविध ग्राहक संघटनांनी निषेध केला असून शहरात समान दर असावेत, अशी त्यांची मागणी आहे.
स्पर्धा आयोगाचा आदेश
तिन्ही कंपन्यांच्या पेट्रोलचे दर देशात समान कसे असू शकतात, असा आक्षेप नोंदविताना हे दर समान नसावेत, असे निर्देश भारतीय स्पर्धा आयोगाने दोन वर्षांपूर्वी दिले होते. या कंपन्यांमध्ये केंद्र सरकारचा ४९ टक्के आणि लोकांचा ५१ टक्के वाटा आहे. तिन्ही कंपन्यांचे एमडी आणि चेअरमन आणि त्यांची कार्यप्रणाली वेगवेगळी असल्यामुळे पेट्रोलचे दर समान असू शकत नाही. या कंपन्या आपल्या फायद्यासाठी पेट्रोलच्या दरात कपात करतात आणि वाढवितात, असा आरोपही त्यावेळी आयोगाने केला होता. स्पर्धा आयोगाच्या निर्देशानुसारच देशात त्या त्या शहरात कर आकारणीसह पेट्रोलचे दर विभिन्न असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

३.५ लाखांपेक्षा जास्त लिटर विक्री
नागपूर शहरात दररोज ३.५ लाख लिटरपेक्षा जास्त पेट्रोलची विक्री होते. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपांवर पेट्रोलची जास्त विक्री होत असल्याची आकडेवारी आहे. स्वस्त पेट्रोल, ही बाबसुद्धा पेट्रोल विक्रीच्या वाढीसाठी कारणीभूत असू शकते. किमतीच्या तफावतीची माहिती ग्राहकांना मिळाल्यास पेट्रोल भरण्यासाठी ते पहिल्यांदा हिंदुस्थान पेट्रोलियम, नंतर इंडियनच्या पंपाचा शोध घेतील, अशी शक्यता सूत्रांनी वर्तविली.

Web Title: Petrol Price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.