पेट्राेल दरवाढीचा साेशल मीडियावर धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2022 07:50 AM2022-03-31T07:50:00+5:302022-03-31T07:50:02+5:30
Nagpur News पेट्राेल दरवाढीवरून साेशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला जात आहे. अनेक जण पेट्राेलियमच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत असताना काही मीम्सचा वापर करून त्यांची नाराजी व्यक्त करीत आहेत.
विराज देशपांडे
नागपूर : गेल्या ९ दिवसांत आठव्यांदा पेट्राेल, डिझेलच्या दरात वाढ झाली असून, या महागाईने सामान्य नागरिक हाेरपळला आहे. दरम्यान, या दरवाढीवरून साेशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला जात आहे. अनेक जण पेट्राेलियमच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीका करीत असताना काही मीम्सचा वापर करून त्यांची नाराजी व्यक्त करीत आहेत.
बुधवारी सकाळपासूनच सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीसंदर्भातील ट्विट, पोस्ट्सने धुमाकूळ घातला होता. ‘पेट्राेल डिझेल प्राईस हाईक’, ‘फ्युअल प्राईस हाईक’सारख्या हॅशटॅगसह सोशल मीडियावर ही दरवाढ ट्रेंड होत आहे. पेट्राेल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या पाेस्टरला त्रस्त नागरिकांद्वारे हात जाेडतानाच्या फाेटाेंचा महापूर वाहत हाेता.
अनेक नागरिकांनी पेट्रोल पंपावर वाढलेल्या पेट्रोल आणि डिझेलचे दर शेअर केले. एका युजरने लिहिले की, ‘जर तुम्ही एखाद्यावर प्रेम करत असाल तर त्यांना जाऊ द्या. इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत असताना ती व्यक्ती किती पुढे जाऊ शकेल?’
दुसऱ्याने लिहिले, ‘सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर जाण्यासाठी किमती झाडांवर चढत आहेत.’ झाडावर पेट्रोल डिस्पेंसर आहे आणि एक माणूस तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करीत असलेला फोटो शेअर केला.
एका ट्विटर वापरकर्त्यांने लिहिले, ‘आपण लवकरच नवीन लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकार्ड नाेंदविणार आहाेत.’ काहींनी पुष्पा चित्रपटातील प्रसिद्ध संवादाचा वापर करीत, ‘फ्युअल प्राईस : मै झुकेगा नही साला,’ असा संवाद ठेवत तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनचा फाेटाे शेअर केला. एकाने गॅस, डिझेल, पेट्राेलच्या किमतींमुळेच देशाचा जीडीपी वाढत असल्याचा उल्लेख केला.
एकाने लिहिले, ‘दिल्लीने पेट्राेलच्या दरात १०० चा आकडा पार केल्याचे सांगत मुंबईकर तुम्ही तेथे कधी पाेहोचणार,’ असा सवाल केला. अनेकांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. निवडणुका हाेईपर्यंत सरकारने इंधनाचे दर राेखले आणि निवडणुका हाेताच ते वाढविल्याची टीका केली. सरकारच्या समर्थकांनी इतर देशांतील इंधनाचे दर शेअर करीत ते भारतापेक्षा कसे अधिक आहेत, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.