दररोज वाढताहेत पेट्रोलचे भाव : वाहनचालक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 08:40 PM2018-02-08T20:40:49+5:302018-02-08T20:43:12+5:30
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा वाहनचालकांचा सवाल आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव्हा येणार, असा वाहनचालकांचा सवाल आहे.
पेट्रोल पंपचालक पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज बदलण्याच्या झंझटीमुळे त्रस्त झाले आहेत. बुधवारी पेट्रोलचे प्रति लिटर भाव ८१.७० रुपये आणि डिझेल ६८.८९ लिटर होते. गुरुवारी पेट्रोलमध्ये १ पैसा आणि डिझेलमध्ये केवळ ८ पैशांची घसरण झाली. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशावर ताण पडला नाही. पण महिन्याभरात १ ते १५-२० पैसे दरररोज होणाºया भाववाढीमुळे पेट्रोल जवळपास २.५० रुपयांनी वधारले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका आणि उत्तर कोरियादरम्यान असलेल्या तणावामुळे पुढील काही दिवसांत पेट्रोलचे भाव प्रति लिटर १०० रुपयांवर जाऊ शकतात.
विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ठराविक किमतीवर पोहोचल्यानंतर पुन्हा खाली येत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसात स्थानिक बाजारात पेट्रोलचे भाव कमी होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलचे भाव दररोज बदलत असल्यामुळे पेट्रोल पंपचालक त्रस्त आहेत. दररोज सकाळी ५ वाजता पंपावर जाऊन मशीन आणि डिस्प्ले बोर्डावर भाव बदलावे लागतात. ही बाब अत्यंत आवश्यक आहे.