पंप सकाळी बंद; दुपारनंतर काही सुरू, सायंकाळी सर्व सुरळीत; नागपूरात ५० कोटींचे नुकसान
By मोरेश्वर मानापुरे | Published: January 3, 2024 08:19 PM2024-01-03T20:19:46+5:302024-01-03T20:19:54+5:30
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
नागपूर : केंद्राच्या ह्यहिट अँड रनह्ण कायद्याविरूद्ध ट्रक व टँकरचालकांनी सोमवारपासून पुकारलेला संप मंगळवारी रात्री चर्चेनंतर मागे घेतला. पण दोन दिवसात नागपूर जिल्ह्यातील कोरडे झालेले ३०० पंप बुधवारी सकाळीही डेपोतून इंधनाच्या पुरवठ्याअभावी बंद होते. कंपन्यांच्या काही पंपावर पेट्रोल आणि डिझेलची विक्री झाली. इंधनाच्या पुरवठ्यानंतर काही दुपारी सुरू झाले तर सायंकाळनंतर हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल आणि खासगी कंपन्यांच्या पंपावर स्थिती सुरळीत झाली.
आंदोलनामुळे व्यावसायिकांचे जवळपास ५० कोटींचे नुकसान झाले. सकाळी पेट्रोल पंपांची पाहणी केली असता नंदनवन, गुरुदेवनगर, खरबी, वर्धमाननगर, सक्करदरा, रेशिमबाग, मानेवाडा रोड, अजनी, सीताबर्डी या भागातील पंप बंद होते. यातील काही दुपारनंतर सुरू झाले तर सायंकाळी सर्वच पंपावर पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. सायंकाळी कोणत्याही पंपावर वाहनचालकांच्या रांगा दिसल्या नाहीत.
पंपावर टँकर खाली होण्यास लागतात २० मिनिटे
आंदोलनामुळे चालकांनी टँकर कंपन्यांच्या डेपोबाहेर उभे केले होते. आंदोलन मागे घेण्याची घोषणा सायंकाळनंतर झाली. त्यामुळे चालकांना टँकरमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरता आले नाही. पण बुधवारी सकाळी १० नंतर इंधन टँकरमध्ये भरून शहरात आणि ग्रामीण भागात रवाना होऊ लागले. त्यामुळे दुपारनंतर काही पंपावर वाहनचालकांना पेट्रोल मिळू लागले. डेपोत टँकरमध्ये पेट्रोल भरण्यास २० मिनिटे आणि पंपावर खाली होण्यास २० मिनिटे लागतात. टँकरला डेपोतून शहर आणि ग्रामीण भागातील पंपापर्यंत येण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात. हा कालावधी बघता दुपारनंतरच पंपावर पेट्रोल आणि डिझेल उपलब्ध होऊ लागले.
सकाळी कार्यालयात जाणारे पेट्रोलपासून वंचित
रात्री आंदोलन मागे घेण्याच्या घोषणेनंतर टँकरचालकांना मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी डेपोत पेट्रोल टँकरमध्ये भरता आले नाही. त्यामुळे बुधवारी कार्यालयात जाणाऱ्यांना वाहनात पेट्रोल भरता आले नाही. त्यांना जपूनच वाहने चालवावी लागली.
लोकांनी जास्त पेट्रोल भरल्याने इतर वाहनचालकांना त्रास
पंपावरील पेट्रोल संपल्यांच्या अफवांमुळे लोकांनी इतरांची चिंता न करता आपल्या वाहनाची टाकी फूल केली. त्यामुळे सोमवारीच अनेक पंप कोरडे झाले. मंगळवारी मोजक्यात पंपांवर काहीच लोकांना पेट्रोल मिळाले. बुधवारी मुबलक पेट्रोल उपलब्ध झाल्याने वाहनचालकांची चिंता मिटली.
५० कोटींचे नुकसान, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा
ट्रक आणि टँकरचालकांच्या बंद आंदोलनामुळे नागपूर जिल्ह्यात ट्रान्सपोर्टचे जवळपास ५० कोटींचे नुकसान झाले. विदर्भातील जवळपास १५ लाख ट्रक रस्त्यावर धावले नाहीत. ट्रक रस्त्यावर उभे झाल्याने व्यापाऱ्यांचा माल वेळेत पोहचू शकला नाही. शिवाय बराच माल ट्रान्सपोर्टमध्ये पडून होता. माल खराब झाल्याचा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसला. आंदोलनाचा फळे, भाजीपाला, दूध आणि कृषी मालाच्या पुरवठ्यावरही परिणाम झाला.