पेट्रोल चोरीला बसणार आळा! पेट्रोल घोटाळा करणाऱ्यांवर मोक्का लावणार; गिरीश बापट यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 09:46 PM2017-12-15T21:46:29+5:302017-12-15T21:48:40+5:30
पेट्रोल पंपावर मायक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी चोरी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) किंवा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत औचित्यावरील प्रश्नाच्या उत्तरात दिली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पेट्रोल पंपावर मायक्रोचिपच्या माध्यमातून पेट्रोल चोरी करून ग्राहकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी चोरी करणाऱ्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) किंवा एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत औचित्यावरील प्रश्नाच्या उत्तरात दिली. आ. संजय दत्त यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता.
उत्तर प्रदेशात पेट्रोल पंपांवर घालण्यात आलेल्या धाडीत पेट्रोल चोरीत ठाण्यातील एक व्यक्ती सहभागी असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर महाराष्ट्रीतील १८६ पेट्रोल पंपांची तपासणी करण्यात आली. यात ९६ ठिकाणच्या मशीनमध्ये फेरबदल केल्याचे आढळून आले होते. ५९ पेट्रोप पंप जप्त करून त्यांची तपासणी करण्यात आली. या संदर्भात केंद्र सरकारला कळविल्यानंतर ८ पेट्रोलपंप बंद करण्यात आले तसेच ३३ जणांना अटक करण्यात आली. यात १४ पेट्रोल पंपचालक व मालकांचा यात समावेश आहे. परंतु त्यानंतर काही पेट्रोलपंप चालकांनी न्यायालयातून यावर स्थगनादेश मिळविला, अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली.
पेट्रोल पंपांवर मायक्रोचिपच्या माध्यमातून कमी पेट्रोल देऊन ग्राहकांची फसणूक होते. यात कोट्यवधींचा घोटाळा असल्याचा मुद्दा संजय दत्त यांनी औचित्याच्या माध्यमातून उपस्थित केला.