‘ई-फनेल’ आणि ‘स्मार्ट डीजी डिव्हाईस’मुळे थांबणार पेट्रोलचोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 07:59 PM2019-07-08T19:59:33+5:302019-07-08T20:00:27+5:30
पेट्रोल पंपांवर अनेकदा कमी प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यात येते अशा ग्राहकांकडून तक्रारी येतात. यासंदर्भात ब्रम्हपुरीतील अभियंता साहिल चावला यांनी अनोखे संशोधन केले आहे. वाहनांमध्ये पेट्रोल डिझेलची अशा प्रकारे चोरी झाली तर लगेच त्याची माहिती देणारे ‘ई-फनेल’ व ‘स्मार्ट डीजी डिव्हाईस’ तयार करण्यात आले आहे. या ‘डिव्हाईस’च्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलची चोरी थांबविली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेट्रोल पंपांवर अनेकदा कमी प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यात येते अशा ग्राहकांकडून तक्रारी येतात. यासंदर्भात ब्रम्हपुरीतील अभियंता साहिल चावला यांनी अनोखे संशोधन केले आहे. वाहनांमध्ये पेट्रोल डिझेलची अशा प्रकारे चोरी झाली तर लगेच त्याची माहिती देणारे ‘ई-फनेल’ व ‘स्मार्ट डीजी डिव्हाईस’ तयार करण्यात आले आहे. या ‘डिव्हाईस’च्या माध्यमातून पेट्रोल-डिझेलची चोरी थांबविली जाऊ शकते, असा दावा त्यांनी केला आहे.
पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. पेट्रोल भरताना मशीनमधील काटा शून्यावरून सुरू होत नाही. या माध्यमातून पेट्रोलपंपावरील कर्मचारी दिवसभरातून हजारो रुपयांची चोरी करतात. यावर त्यांना अनेकदा ‘कमिशन’देखील मिळते. चावला यांना स्वत: अशा पेट्रोल-डिझेलचोरीचा अनुभव आल्यानंतर त्यांनी यावर नियंत्रण आणणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचा संकल्प घेतला.
२०१५ साली यासाठी काम सुरू केले. ‘ई-फनेल’ आणि ‘स्मार्ट डिजी डिव्हाईस’मुळे बसल्या बसल्या इंधन चोरीची माहिती मिळू शकते, असे साहिल चावला यांनी सांगितले. या ‘डिव्हाईस’मध्ये ‘जीपीएस’ प्रणाली लावण्यात आली आहे. सोबतच याला मोबाईलसोबतदेखील जोडता येऊ शकते. ‘जनरेटर’मध्ये जर ८० लीटर इंधन भरले आहे, मात्र त्यात ५० लीटर इंधन भरण्यात आले तर या तंत्रज्ञानाने ही बाब लगेच कळेल. याचा ‘बॅटरी बॅकअप’ १०० तासांचा असतो. ही प्रणाली ‘डिझेल’ प्रणालीला नियंत्रित करते. या तंत्रज्ञानाचे ‘पेटंट’ करण्यात आले आहे, असेदेखील त्यांनी सांगितले.
संघर्षातून मिळाले यश
मूळचे ब्रम्हपुरी येथील असलेले साहिल यांनी नागपुरातून अभियांत्रिकीचा अभ्यास केला. २८ वर्षाच्या वयात ते एका कंपनीचे मालक आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना नोकरीच्या अनेक संधी होत्या. मात्र बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा शहरात राहूनच काहीतरी वेगळे करावे या विचारातून संशोधनावर भर दिला. बऱ्याच संघर्षानंतर हे तंत्रज्ञान विकसित झाले, असे त्यांनी सांगितले.