एसडीओच्या दालनातच अंगावर ओतून घेतले पेट्रोल; नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2022 09:45 PM2022-05-23T21:45:23+5:302022-05-23T21:46:03+5:30
Nagpur News वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विक्रीनंतर शिल्लक २० आर जमिनीचा सात-बारा मला देण्यात यावा, अशी मागणी करीत एका शेतकऱ्याने उमरेड उपविभागीय अधिकाऱ्याच्या (एसडीओ) दालनातच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
नागपूर : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या विक्रीनंतर शिल्लक २० आर जमिनीचा सात-बारा मला देण्यात यावा, अशी मागणी करीत एका शेतकऱ्याने उमरेड उपविभागीय अधिकाऱ्याच्या (एसडीओ) दालनातच अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सागर काशिनाथ मंदरे (४८, रा. मकरधोकडा, ता. उमरेड) असे शेतकऱ्याचे नाव आहे. त्याला उमरेड पोलिसांनी अटक केली आहे.
मौजा मकरधोकडा येथे काशिनाथ उपासराव मंदरे यांची शेतजमीन होती. सागर मंदरे हा त्यांचा मुलगा. सागरच्या सांगण्यानुसार त्याच्या वडिलांच्या नावे २.८३ हे. आर शेतजमीन होती, त्यापैकी २.६३ हेक्टर आर विकली होती. उर्वरित २० आर शेतजमिनीचा मला सात-बारा पाहिजे आहे. या कामासाठी गत २५ वर्षांपासून स्थानिक कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करीत असतानाही मला न्याय मिळाला नाही, या कारणाने मी आज सोमवारी दुपारच्या सुमारास पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे त्याने सांगितले. माझी समस्या सुटली नाही, तर कुटुंबासह आत्महत्या करण्याचा इशारा सुद्धा सागर मंदरे याने दिला आहे.
उमरेड पोलीस ठाण्यात याप्रकरणी ३०९ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मंदरे यास अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांनी दिली.
आणि कर्मचारी धावले...
सोमवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास, मला न्याय पाहिजे. सात-बारा द्या, नाही तर आत्महत्या करतो... अशी धमकी देत सागर मंदरे याने अंगावर पेट्रोल ओतून घेतले. आगपेटी खिशातच होती. तो आगपेटी हातात घेत असतानाच एसडीओ कार्यालयातील कर्मचारी धावले. लागलीच पोलिसांनाही बोलाविण्यात आले. यामुळे मोठा अनर्थ टळला.
मंत्रालय उडविण्याची धमकी
सागर मंदरे याने यापूर्वी सुद्धा आत्महत्येचा आणि धमकीचा प्रकार केला आहे. यापूर्वी त्याने बॉम्ब ठेवून मंत्रालयच उडवित असल्याचा निनावी फोन केला होता. याप्रकरणी ३० मे २०२१ रोजी गुप्तहेर खात्याने त्याला अटक सुद्धा केली होती. या प्रकरणामुळे नागपूर ते मुंबईपर्यंतची सुरक्षा यंत्रणा हादरून गेली होती.
-