नागपूर दामिनी पथकाची एक लाखावर ठिकाणी पेट्रोलिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 10:00 PM2019-02-20T22:00:19+5:302019-02-20T22:02:25+5:30
महिलांच्या संरक्षणासाठी गुन्हे शाखेच्या भरोसा सेल अंतर्गत कार्यरत दामिनी पथकाने गत दोन वर्षात १ लाख १० हजार ८११ ठिकाणी पेट्रोलिंग केली व आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी ४४६ सापळे रचले. माहितीच्या अधिकारातून ही माहिती पुढे आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांच्या संरक्षणासाठी गुन्हे शाखेच्या भरोसा सेल अंतर्गत कार्यरत दामिनी पथकाने गत दोन वर्षात १ लाख १० हजार ८११ ठिकाणी पेट्रोलिंग केली व आरोपींना रंगेहात पकडण्यासाठी ४४६ सापळे रचले. माहितीच्या अधिकारातून ही माहिती पुढे आली.
या पथकाची १ जानेवारी २०१७ रोजी स्थापना करण्यात आली. शहरात परिमंडळनिहाय चार दामिनी पथके कार्यरत असून एका पथकामध्ये ४ महिला शिपाई व १ वाहनचालकाचा समावेश असतो. या पथकांनी २०१७ मध्ये ३८ हजार ३३० ठिकाणी पेट्रोलिंग केली व ६ सापळे रचले तर, २०१८ मध्ये ७२ हजार ४८१ ठिकाणी पेट्रोलिंग केली व ४४० सापळे रचले. यापैकी दोन सापळे यशस्वी ठरले. दरम्यान, या पथकाने बेलतरोडी येथे एक तर, अंबाझरी येथे ६ आरोपींविरुद्ध विनयभांगाचे गुन्हे दाखल केले. पुरुषांनी स्त्रियांना निर्जनस्थळी त्रास दिल्याची एकही तक्रार या दोन वर्षात पथकाकडे करण्यात आली नाही. परंतु, सार्वजनिक ठिकाणी त्रास दिल्याच्या दोन तक्रारी करण्यात आल्या. छेडछाडीच्या तक्रारीही झाल्या नाहीत असे माहितीत नमूद करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी गुन्हे शाखेकडे अर्ज दाखल केला होता.