मेयामध्ये पीजीच्या २० जागा वाढल्या : ७२ जागांवर प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:16 PM2019-03-12T23:16:45+5:302019-03-12T23:17:44+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ५६ वरून ७२ झाल्या. तब्बल २० जागा वाढविण्यात मेयो प्रशासनाला यश आले आहे. यात सर्वात जास्त औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या (मेडिसीन) सहा जागाचा समावेश आहे. ‘पीजी’ जागेत वाढ झाल्याने याचा फायदा विदर्भातील विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ५६ वरून ७२ झाल्या. तब्बल २० जागा वाढविण्यात मेयो प्रशासनाला यश आले आहे. यात सर्वात जास्त औषधवैद्यकशास्त्र विभागाच्या (मेडिसीन) सहा जागाचा समावेश आहे. ‘पीजी’ जागेत वाढ झाल्याने याचा फायदा विदर्भातील विद्यार्थ्यांना होण्याची शक्यता आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने २०१८-१९ या वर्षात सर्व मेडिकल कॉलेजच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय विज्ञान परिषदेने (एमसीआय) राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमांच्या जागा वाढवून देण्यास तत्त्वत: मंजुरी दिली होती. यामुळे राज्यात ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात व जिथे आवश्यक पायाभूत सोयी, मनुष्यबळ व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत अशा सर्व महाविद्यालयांच्या जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात होती. मेयोमध्ये उपलब्ध सोईसुविधा व आवश्यक मनुष्यबळानुसार ‘पीजी’च्या २० जागा वाढविण्यात आला. यात कान, नाक, घसा विभागाची (ईएनटी) एक, मेडिसीन विभागाचा सहा, स्त्री रोग व प्रसुती शास्त्र विभागाचा (गायनीक) तीन, नेत्ररोग विभागाचा दोन, अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाचा पाच, रेडिओलॉजी विभागाची एक, उर व क्षयरोग विभागाचा दोन जागा वाढविण्यात आल्या. यामुळे आता ‘पीजी’ जागांची संख्या ५६ वरून ७२ झाली आहे.
आर्थाेपेडिक्स विभागाच्या चार जागा झाल्या कमी
अस्थिव्यंगोपचार शास्त्र (आर्थाेपेडिक्स) विभागात प्राध्यापकाचे एक व सहयोगी प्राध्यापकाचे एक पद रिक्त असल्याने वाढलेल्या पाच जागांमधून चार जागा कमी करण्यात आल्या आहेत. आता या विभागाकडे पीजीच्या दोनच जागा आहेत.