मेयोतील पीजीच्या जागा शंभरी गाठणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:40 AM2019-09-07T00:40:46+5:302019-09-07T00:41:54+5:30
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ८२ वरून १०० वर पोहचण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या (पीजी) जागा ८२ वरून १०० वर पोहचण्याची शक्यता आहे. गुरुवारी मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या (एमसीआय) पथकाने पायाभूत सोयींच्या केलेल्या पाहणीत त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे, ‘पीएसएम’ विभागाच्या दहा, ‘फार्मेकोलॉजी’ व ‘मायक्रोबायोलॉजी’ मिळून आठ जागा वाढतील असे, बोलले जात आहे.
शिक्षक-विद्यार्थ्यांच्या प्रमाणाच्या ‘एमसीआय’च्या नव्या निकषानुसार राज्यात पीजीच्या जागा वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात साधारण ८०० जागा प्रस्तावित आहेत. यातील २०० जागा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी असणार आहेत. या संदर्भातील प्रस्ताव त्या-त्या महाविद्यालयाने आपल्या निकषानुसार ‘एमसीआय’कडे तर आर्थिक दुर्बल घटकाचा वाढीव जागेचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पाठविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी ‘एमसीआय’च्या दोन सदस्यीय चमूने मेयोची पाहणी केली. मेयोच्या बाह्यरुग्ण विभागापासून ते सर्जिकल कॉम्प्लेक्स, मुला-मुलींचे वसतिगृहांना चमूने भेटी दिल्या. सूत्रानुसार, ही पाहणी ‘रोगप्रतिबंधक व सामाजिक औषधशास्त्र विभाग’ (पीएसएम), औषध निर्माणशास्त्र विभाग (फार्मेकोलॉजी) व सूक्ष्मजीवशास्त्र विभाग (मायक्रोबायोलॉजी) विभागाच्या ‘पीजी’च्या जागांसाठी होती. पाहणीनंतर ‘एमसीआय’च्या चमूने संबंधित विभाग प्रमुख व अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांच्याशी चर्चा केली. विशेष म्हणजे, आपल्या पाहणीत चमूने एकही त्रुटी काढली नाही. यामुळे ‘पीएसएम’ विभागाच्या प्रस्तावित १० जागांसह फार्मेकोलॉजी व मायक्रोबायोलॉजी मिळून आठ जागा वाढण्याची शक्यता आहे, असे झाल्यास मेयोच्या एकूण ८२ जागांवरून १०० जागा होतील.
एमआरआय लवकरच रुग्णसेवेत
‘एमसीआय’ चमूने सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये स्थापन होत असलेल्या ‘एमआरआय’ यंत्राचीही पाहणी केली. सूत्रानुसार, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हे यंत्र रुग्णसेवेत दाखल होण्याची हमी यावेळी मेयो प्रशासनाकडून देण्यात आली. शिवाय, पुढील महिन्यापर्यंत नवे सीटी स्कॅनही रुग्णसेवेत असणार आहे.