आरटीपीसीआर टेस्टच्या बंधनामुळे औषधविक्रेते नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:07 AM2021-04-24T04:07:45+5:302021-04-24T04:07:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमणाच्या महामारीत मनपाने औषध विक्रेत्यांना नोटीस जारी करत प्रत्येक १५ दिवसांनंतर आरटीपीसीआर टेस्टचे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमणाच्या महामारीत मनपाने औषध विक्रेत्यांना नोटीस जारी करत प्रत्येक १५ दिवसांनंतर आरटीपीसीआर टेस्टचे बंधन घातले आहे. टेस्ट केली नसल्यास दंड वसूलण्याचा इशारा दिला आहे. मनपाच्या या धोरणाबाबत औषध विक्रेत्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नागपूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या निर्णयाचा विरोध केला असून, हे निर्बंध रद्द केले नाहीत तर तीव्र आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.
एकीकडे औषध विक्रेत्यांना औषधालये उघडण्यास सांगितले जात आहे आणि दुसरीकडे आरटीपीसीआरचे बंधन घातले जात आहे. आरटीपीसीआर केंद्रांवर प्रचंड गर्दी आहे. टेस्ट करण्यास गेलेला औषधविक्रेता या गर्दीतून संक्रमित होण्याची शक्यता अधिक आहे. शिवाय, रिपोर्टही उशिराने मिळत असल्याचे असोसिएशनचे सचिव हेतल ठक्कर यांनी सांगितले. विशेष म्हणजे, रात्रंदिवस सेवा देणाऱ्या औषध विक्रेत्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा प्रदान करण्यात आलेला नाही. त्यामुळे लस घेण्यासही अडचण येत आहे. आता मनपाने नोटीस जारी करून दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे. नागपुरात जवळपास चार हजार औषधालये आहेत. मनपाने हा निर्णय मागे घेतला नाही तर असोसिएशन संप पुकारण्याचा निर्णय घेईल, असा इशारा ठक्कर यांनी दिला आहे.