‘एनएफएससी’ मध्ये सुरू होईल पीएचडी कोर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 11:02 AM2020-11-11T11:02:47+5:302020-11-11T11:06:24+5:30
Fire engineering Nagpur News देशातील एकमेव राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) नागपुरात लवकरच पीएच.डी. व एमटेक अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात तयारी सुरू आहे.
आशिष दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील एकमेव राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय (एनएफएससी) नागपुरात लवकरच पीएच.डी. व एमटेक अभ्यासक्रम सुरू करू शकते. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्याची संस्थेची तयारी सुरू आहे.
लोकमतशी चर्चा करताना एनडीआरएफचे नवनियुक्त कमांडंट व एनएफएससीचे संचालक रमेशकुमार म्हणाले की, दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. त्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यासाठी काम सुरू आहे. लवकरच सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची वाढती मागणी लक्षात घेता जागा वाढविण्याचाही विचार करण्यात येत आहे. यामागचे कारण संशोधनाला चालना देण्याचे आहे. नैसर्गिक आपत्तीबरोबरच मानवनिर्मित आपत्तीला योग्य पद्धतीने निपटण्यासाठी मानव संसाधन तयार करायचे आहे. तसेच एनडीआरएफमध्ये केमिकल व बायोलॉजिकल आपत्तीचे निर्मूलन करण्यासाठी संशोधन सुरू आहे. हे संशोधन नागपुरात व्हावे, अशी अपेक्षा आहे.
कमांडंट रमेशकुमार यांनी सांगितले की, देशात प्रशिक्षित मानव संसाधन तयार करण्यासाठी एनडीआरएफ एक महत्त्वपूर्ण योजना तयार करीत आहे. याअंतर्गत जिल्हास्तरावर सर्व लोकांना प्रशिक्षण द्यायचे आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात कम्युनिटी तयार करायची आहे. सध्या देशभरात एनडीआरएफच्या एकूण १३ बटालियन आहेत. २०२१ पर्यंत ४ बटालियन आणखी तयार करायच्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनाला उत्तम बनविण्यासाठी, आपत्तीचा सक्षम पद्धतीने सामना करण्यासाठी संस्थेमार्फत प्रशिक्षणात सुधार आणायचा आहे.
बीएसएफचे अधिकारी होते रमेशकुमार
रमेशकुमार यांनी एनडीआरएफचे कमांडंट पद सांभाळल्यानंतर मंगळवारी राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या संचालकाचा पदभार ग्रहण केला. यापूर्वी बीएसएफमध्ये असताना त्यांनी पाकिस्तान व बांगलादेश बॉर्डरवर उल्लेखनीय काम केले. ते बीएसएफ कॅडरचे १९९१ बॅचचे अधिकारी आहेत. त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल २०१९ मध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले. पदभार ग्रहण केल्यानंतर उपकमांडंट कमलेशकुमार, निशांत चौधरी व अन्य अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.